मुंबई : “सध्या आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत, पण लवकरच मुंबईला वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल बनवण्याचं स्वप्न साकार होणार आहे,” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बीकेसी येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेत राज्यातील महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प, विकास कामं यावर चर्चा झालीच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी एक क्रांतिकारी घोषणा झाली – भारतातील सर्वात मोठी आणि प्राथमिक क्रिएटिव्ह टेक्नोलॉजी संस्था, म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नोलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार आहे.
या संस्थेसाठी मुंबईतील फिल्मसिटीजवळ जागा निश्चित करण्यात आली असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि फिक्कीसारख्या आघाडीच्या संस्थांच्या सहकार्याने हे भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारचे विशेष आभार मानले.
Railway News : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दाखवणारी विशेष रेल्वे सुरू करणार
या संस्थेमुळे भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी मुंबई एक हब ठरणार आहे. पोस्ट प्रॉडक्शन, स्टुडिओज, फिल्म टेक्नोलॉजी, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससारख्या आधुनिक सेवा आणि अभ्यासाचे वर्ल्ड क्लास सेंटर इथे उभारले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या वेळी स्पष्ट केलं की, मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (INB) ताब्यातील जवळपास २४० एकर जागेत या भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन को-क्रिएशन मॉडेलद्वारे काम करणार आहेत.
या प्रकल्पांमुळे मुंबईचं स्थान केवळ देशातच नव्हे, तर जगात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रमुख केंद्र म्हणून बळकट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.