Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार?


मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अमित शहा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानीही जाणार आहेत.यानिमित्ताने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा शनिवारी (दि.१२) दुर्गराज रायगडला भेट आणि त्यानंतर मुंबईतील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील समन्वय आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अमित शाह रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.



दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी अमित शहा शुक्रवारी (दि.११) रात्री पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शनिवारी (दि.१२) सकाळी त्यांच्या रायगड दौऱ्याला सुरुवात होईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन आणि त्यानंतर सकाळी ११ वाजता रायगड किल्ल्याला भेट, असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अमित शहा येथील कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर दुपारी २ वाजता ते सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल होतील. सुनील तटकरे यांच्याकडे दुपारच्या भोजनानंतर ३.३० सुमारास अमित शहा यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईत एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रात्री ते सह्याद्री अतिथीगृहात पोहचतील.

Comments
Add Comment