वणी : आग ओकणारा सूर्य, त्यात पायी प्रवास. यामुळे अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारांनी आदिमायेच्या भक्तीत चिंब भिजत लाखो भाविक गडावर दाखल झाले. त्यानंतर दर्शनबारीत तासनतास उभे राहत लाखो भाविक देवी चरणी लीन झाले. आई भगवतीच्या भेटीसाठी खानदेश प्रांतातून आलेले सुमारे दोन लाखांवर भाविक भक्त सप्तशृंगगडावर भक्तीसागरात दंग झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) दुपारी आदिमायेच्या किर्तीध्वजाचे ट्रस्ट कार्यालयात विधीवत पूजन होवून ढफ-ढोलाच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. रात्री १२ वाजता मध्यरात्री गडाच्या शिखरावर किर्तीध्वज फडकल्यानंतर खानदेशवासियांनी ध्वजाचे दर्शन घेतले.
आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगी माता चैत्रौत्सवादरम्यान आजची चतुर्दशी (चौदस) निमित्त आदिमायेच्या दर्शनासाठी खानदेश वासियांच्या दृष्टीने विशेष महत्व असल्याने लाखावर भाविक सप्तशृंगीचा जयघोष करत ढोल-ताशांचा निनादात अनवाणी आलेल्या भाविकांचे पावले अविश्रांतपणे सप्तश्रृंगगड पायी रस्ता चढून आले. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शनार्थी भाविकांची गर्दी वाढत जाऊन बाऱ्या लागल्या होत्या. सकाळी ७.३० वाजता देवीच्या अलंकारांची ढोल- ताशाच्या गजरात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून मिरवणूक काढण्यात आली. भगवतीची आजची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मनज्योत पाटील व विश्वस्त डॉ. प्रशांत देवरे यांनी परिवारासमेवत केली. दुपार सत्रात विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात किर्तीध्वजाची विधिवत पूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी. व्ही. वाघ, उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त मंडळ प्रतिनिधी अॅड. ललित निकम, अॅड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, ध्वजाचे मानकरी एकनाथ गवळी, विष्णू गवळी. कृष्णा गवळी, काशिनाथ गवळी, आनंदा गवळी, दत्तू गवळी, ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, पोलिस पाटील शशिकांत बेनके आदींनी केले.