वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळून थेट हडसन नदीत पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे महापौर एरिक एडम्स यांनी या दुर्घटनेची माहिती दिली.या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर न्यूयॉर्क हेलिकॉप्टर टूर्सकडून चालवलं जात होतं. हेलिकॉप्टरने सायंकाळी तीनच्या सुमारास उड्डाण केलं. हडसन नदीवरून उत्तर दिशेनं जात असताना ते नदीत कोसळलं आणि बुडालं. हेलिकॉप्टरमध्ये एक स्पॅनिश कुटुंब होते.यामध्ये सिमेन्स कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ अगस्टीन एस्कोबार, त्यांची पत्नी आणि तीन मुलं होती. या पाचही जणांसोबत पायलटचासुद्धा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हेलिकॉप्टर हवेतच तुटताना दिसलं. त्याचा मागचा भाग आणि प्रॉपलर वेगळं होऊन खाली पडत होतं. प्रॉपलर हेलिकॉप्टरपासून वेगळं झाल्यानंतर फिरत राहिलं. सोशल मीडियावर याचे व्हिडीओसुद्धा व्हायरल झाले आहेत.
Dear God
The rotor came off this helicopter
There was nothing the pilot could do after that
Maintenance history will be a key part of this investigation
A family was reportedly onboard doing an aerial tour
Just awful 😢
— Phil Holloway ✈️ (@PhilHollowayEsq) April 10, 2025
या अपघाताचे कारण तपासले जात असल्याचे पोलिस आयुक्त टिश यांनी सांगितले की, अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीवरून उत्तरेकडे जाण्याऐवजी दक्षिणेकडे गेले. नंतर न्यू जर्सीच्या किनाऱ्यावर दक्षिणेकडे परतले, जिथे ते कोसळले. कमिशनर टिश म्हणाले की, बहुतेक प्रवाशांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. मॅनहॅटन ओलांडून हडसन नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या जर्सी सिटीमधील आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. ट्रम्प म्हणाले की, हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून भयंकर दुर्घटना घडली. यात पायलट, पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. दुर्घटनेचा व्हिडीओ भितीदायक आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना यातून सावरण्याची ताकद मिळू दे.