Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

चांगभलंच्या गजरात चैत्र यात्रेला सुरुवात

चांगभलंच्या गजरात चैत्र यात्रेला सुरुवात

कोल्हापूर : गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ‘ज्योतिबाच्या नावाने चांगभल’च्या गजराने दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सज्ज झाले आहे. दर्शन रांग, पार्किंग आणि अन्नछत्र भक्तांनी गजबजून गेले आहे. संपूर्ण यात्रेवर दोन हजार पोलीस आणि ११५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी इथल्या दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. माघ महिन्यात ज्योतिबाचे पाच खेटे मारून झाल्यानंतर चैत्र महिन्यात ज्योतिबाची यात्रा भरते. चैत्र पौर्णिमा हस्त नक्षत्रावर जोतिबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यासाठी पहाटे पाच ते सहा वाजता जोतिबाचा शासकीय महाअभिषेक होतो. साधारण सकाळी नाथांची महावस्त्र आणि अलंकारिक पूजा केली जाते. दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुख्य यात्रेचा प्रारंभ होतो.

यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, जोतिबा मंदिरातील सर्व पुजारी आणि मानाच्या सासनकाठ्या यावेळी उपस्थित असतात. परंपरेनुसार उद्या शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी डोंगरावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचे वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच १ पोलीस अधीक्षक, २ अपर अधीक्षक, ६ उपअधीक्षक, २५ निरीक्षक, ७० उपनिरीक्षक, महिला पोलीस, वाहतूक पोलीस, शीघ- कृती दल, आरसीपी, होमगार्ड, एसआरपी असे दोन हजारांवर पोलीस तैनात आहेत. जोतिबा डोंगर परिसरात ३४ हून अधिक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलं आहे. सासनकाठीधारकांना स्वतंत्र वाहनतळ आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आलाय. या संपूर्ण मार्गावर वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आलेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >