Wednesday, August 27, 2025

एका झाडामुळे शेतकरी करोडपती!

एका झाडामुळे शेतकरी करोडपती!

यवतमाळ : तुम्हाला जर समजलं एका झाडामुळे तुम्ही करोडपती होणार आहात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. अशीच एक घटना यवतमाळ मध्ये घडली आहे. यवतमाळच्या शेतकऱ्याला एका झाडाच्या बदल्यात ४कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत. पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे यांच्या वडिलोपार्जित झाडामुळे त्यांना अचानक ही लॉटरी लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी केशव शिंदे यांच्या ७ एकर वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. २०१३ -१४ पर्यंत हे झाड कशाचे आहे हे यांच्या परिवाराला माहीतच नव्हते. २०१३ -१४ साली या ठिकाणी रेल्वे खात्याने सर्वे केला. त्यावेळी कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले होते. त्यांनी हे झाड रक्त चंदनाचे असल्याचे आणि त्याचे मूल्य शिंदे परिवाराला समजावून सांगितले. त्यावेळेस शिंदे परिवार एकदम चक्रावून गेला. त्यानंतर रेल्वेने भूसंपादन केले मात्र या झाडाचे मूल्य देण्यास रेल्वे खाते टाळाटाळ करत होते. त्यामुळे या परिवाराने या झाडाचे खासगी संस्थेकडून मूल्यांकन काढले. त्यावेळेस त्याचे मूल्यांकन ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे समोर आले.

मात्र रेल्वेने ते देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिंदे कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आता त्यातील पन्नास लाख रुपये शेतकर्‍याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ते पैसे काढण्याची परवानगी शिंदे परिवाराला देण्यात आली आहे. सुरुवातीला शिंदे कुटुंबाने खाजगी अभियंत्याकडून रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन काढले . मात्र ते जास्त असल्याने रेल्वे त्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले गेले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा