जळगाव : शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेची मुलगी तहसीलदार पदावर नोकरीला लागेल, तसेच शासकीय योजनेसाठी अर्ज भरून पैसे मिळतील, अशा आमिषाने एका महिलेची १० लाख ७३ हजार ९५० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार कल्पना आत्माराम कोळी (५३) यांची आरोपी ज्योती अशोक साळुंखे (रा. मन्यारवाडा, जळगाव) हिच्याशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. पुढे दोघींमध्ये मैत्री झाली. यानंतर साळुंखे यांनी कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला तहसीलदार पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या प्रलोभनाला बळी पडत त्यांनी वेळोवेळी रोख रक्कम व दागिने असे एकूण ७ लाख २२ हजार रुपये दिले.
त्यानंतर शासकीय योजनेसाठी अर्ज भरल्यास प्रति अर्ज १०० रुपये मिळतील, असे सांगून साळुंखे यांनी कोळी यांच्या मुलीकडून ५६० अर्ज भरवून घेतले व त्यातून ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतःकडे ठेवले. मात्र नोकरी व कोणतीही योजना न मिळाल्यामुळे कोळी यांनी पैसे परत मागितले असता, आरोपीने धमकी दिली आणि पैसे देण्यास नकार दिला. या प्रकारानंतर तक्रारदार कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार ज्योती साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.