पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी!
मुंबई : दिव्यांगांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीसाठी माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) एकाच वेळी पोहोचले आणि तिथेच दोघांमधे शाब्दिक सामना रंगला. त्यामुळे बैठकीपेक्षा अधिक चर्चा यावरच सुरु आहे.
पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहणाविरोधातील आंदोलनात बच्चू कडू यांचा सहभाग पाहून अजित पवारांनी त्यांच्यावर सूचकपणे टीका केली. “तुम्ही त्या आंदोलनात लक्ष घालू नका!” असे दादा म्हणाले आणि बस्स, तिथूनच दोघांमध्ये खडाजंगी सुरु झाली.
छगन भुजबळ नाराज; म्हणाले, मी फक्त आमदार, उपोषण करायला मोकळा!
अजित पवारांचं सूचक वक्तव्य आणि कडूंचं ठाम उत्तर
अजित पवारांनी बच्चू कडूंना आंदोलनात न पडण्याचा सल्ला दिला. त्यावर कडूंनी स्पष्ट उत्तर दिलं की, “मला शेतकऱ्यांनी बोलावलंय, त्यामुळे मी जाणारच.” यावर अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिक मोबदला दिला जाईल. मात्र, कडूंनी जरा वेगळाच मुद्दा मांडला. “शेतकरी जर पूर्णपणे विस्थापित होणार असतील, तर असा प्रकल्पच नको! आणि जर खासगी विमाने उडणार असतील, तर शेतकऱ्यांना मोबदल्याबरोबर भागीदारीही द्या!”
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांचा रोष
पुरंदर तालुक्यातील सात गावांतील जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहेत. यावर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून याआधी तीन दिवस उपोषणही करण्यात आले. आता शेतकऱ्यांनी बच्चू कडूंना २० एप्रिलला आंदोलनात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे आणि त्यांनीही होकार दिला आहे.
त्यामुळे “ब्रम्हदेव आले तरी हा प्रकल्प करणारच!” अशी जाहीर घोषणा करणाऱ्या अजित पवारांसमोर आता बच्चू कडूंचा सहभाग एक मोठा राजकीय इशारा मानला जातोय.
त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या आंदोलनात ठाम राहणार का? की सरकार त्यांच्या पाठिंब्याची वाट पाहत ‘मनधरणी’ करणार? शेतकऱ्यांना दिलेला शब्द ते पाळणार की उपमुख्यमंत्र्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार? या साऱ्या घडामोडींवर सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे!
याआधीही झाली होती ‘तू तू मैं मैं’
अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात याआधीही ‘तू तू मैं मैं’ झाल्याचे पाहायला मिळाले होते. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला.
अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अकोला जिल्ह्याला दिलेल्या निधीवर बच्चू कडू समाधानी नव्हते. परिणामी अजित पवार यांच्या निधी वाटपावर बच्चू कडू यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली.