मुंबई : हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण म्हणून हनुमान जयंती उत्सव ओळखला जातो. हा उत्सव हनुमान जयंतीच्या दिवशी करतात. प्रभू रामाचा निस्सीम भक्त असलेल्या भगवान हनुमानाच्या भक्तीचे प्रतिक म्हणून हनुमान जयंती उत्सव साजरा करतात. भगवान हनुमान अर्थात मारुती हे धैर्य, निःस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतिक आहे. भारतासह जगभरात हनुमान जयंती उत्सव उत्साहाने साजरा करतात.
यंदा शनिवार १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती आहे. या वर्षी १२ एप्रिल रोजी पहाटे ०३:२१ वाजता पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि १३ एप्रिल रोजी पहाटे ०५:५१ वाजता ही तिथी संपत आहे. यामुळे हनुमान जयंती उत्सव हा शनिवार १२ एप्रिल रोजी साजरा केला जाईल.
हिंदू पंचांगानुसार हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता. याच कारणामुळे अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते.
हनुमान जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. नंतर हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे. हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात बसून हनुमान चालीसा म्हणावी. गुळ, खोबरे, केळी असा प्रसाद हनुमान भक्तांना वाटावा आणि स्वतः खावा. अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास करतात. तब्येतीला झेपत असल्यास उपवास करावा. हनुमानाची भक्ती केल्याने नकारात्मक उर्जेपासून संरक्षण होते. तनामनात नवी शक्ती आणि उत्साह संचारतो.
हनुमानाचे मंत्र
१. ॐ श्री हनुमते नमः
२. ॐ नमो भगवते हनुमते नमः
३. ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा
ॐ नमो हनुमंतेश्वर रूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महा बलाय सूर्य कोटि समप्रभा
ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा
ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥