ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितलं सुनावणीत नक्की काय घडलं…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड येथे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांच्या उपस्थितीत दुसरी सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निकम यांनी खटल्यातील महत्त्वाचे अपडेट्स दिले.
आरोपी वाल्मिक कराडने मागितलेल्या काही दस्तऐवजांची यादी आज सीआयडीमार्फत न्यायालयात सादर करण्यात आली. काही कागदपत्रे सीलबंद असल्याने ती उघडल्यानंतर आरोपीकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले.
कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याचा दावा
वाल्मिक कराडने न्यायालयात अर्ज दाखल करत स्वत:वर कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याचा दावा करत, खटल्यातून निर्दोष मुक्त करण्याची मागणी केली आहे. या अर्जावर २४ एप्रिल रोजी सीआयडी आपली बाजू मांडणार असून, त्यावर सुनावणी होणार आहे.
मारहाण होत असल्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावा
आज सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण होत असल्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ पुरावा आहे. न्यायालयाला आम्ही विनंती केली आहे की, या व्हिडिओला बाहेर कुठेही प्रसिद्धी मिळू नये. या व्हिडिओचे बाह्य प्रसिद्धीकरण टाळण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
आरोपीच्या मालमत्तेवरही कारवाईची मागणी
दरम्यान, आरोपीच्या मालमत्तेवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वाल्मिक कराडची चल व अचल संपत्ती मकोका कायद्यांतर्गत जप्त करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, या अर्जावरही सुनावणी होणार आहे.
सीआयडीने घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला होता. त्याचा अहवाल आता सीलबंद स्वरूपात न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहितीही निकम यांनी दिली.
आरोपीच्या अर्जावर २४ एप्रिल रोजी अंतिम निर्णय
आरोपीने अर्ज केल्यामुळे आता त्याच्यावर सुनावणी होईल. वाल्मिकने त्याच्या अर्जात अनेक मुद्दे उपस्थित केलेत. तो खुनात नाही, त्याने खंडणी मागितलेली नाही, असे अर्जात नमूद केले आहे. सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र जमा केली आहेत. कायद्यांतर्गत पुढील तपास अजूनही चालू आहेत. त्यामुळे २४ एप्रिल रोजी आरोपीच्या अर्जावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरु होईल, असे निकम यांनी स्पष्ट केले.