Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Saptashrungi Stampede : सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरी! गर्दीचे नियोजन हुकले, पोलिसांची तारांबळ

Saptashrungi Stampede : सप्तश्रृंगी गडावर चेंगराचेंगरी! गर्दीचे नियोजन हुकले, पोलिसांची तारांबळ

नाशिक : चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगगडावर आदिमायेचे दर्शनासाठी (Saptashrungi Darshan) बुधवार रात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र देवीच्या दर्शनासाठी झालेल्या भाविकांच्या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीमध्ये झाले आहे. आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाल्याने गर्दीचे नियोजन (Saptashrungi Stampede) चुकले. त्यामुळे पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे प्रशासन आणि पोलिस व्यवस्थेची मात्र धावपळ झाल्याचे दिसून आले. भाविकांच्या या गर्दीमुळे मंदिर प्रशासन, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाची मात्र तारांबळ उडाली आहे.



 मिळालेल्या माहितीनुसार, आदिमायेचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शनी मार्गात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी बॅरिकेड्स तुटल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी लहान मुले, वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागला. गर्दीचे नियोजन न झाल्याने भाविकांनी पोलिस आणि सप्तशृंग गड व्यवस्थापन विरोधात नाराजी व्यक्त केली. उत्साही भाविकांनी आदिमायेचा गजर करत ‘अंबे माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून टाकला. मात्र भाविकांच्या वाढलेल्या या गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले. (Saptashrungi Stampede)



सप्तश्रृंगीच्या पहिल्या पायरीजवळच भाविकांची गर्दी


सप्तश्रृंगी गडावर सध्या चैत्रोत्सव सुरू आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत सुरू असतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने दोन ते तीन बैठका घेतल्या असल्या तरी निर्णयांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक असताना प्रशासन कुठेतरी कमी पडतेय का, असे वाटतेय. सप्तश्रृंगीच्या पहिल्या पायरीजवळच भाविकांची मोठी गर्दी झाली. त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून गर्दीचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गर्दीच एवढी होती की तो प्रयत्न अयशस्वी झाला. या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची एक लाईन आणि दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांची दुसरी लाईन करणे आवश्यक होते. तसेच बाजूच्या दुकानांच्या गर्दीसाठीही वेगळे नियोजन करणे आवश्यक होते. पण तसे काहीच झाले नसल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. (Saptashrungi Stampede)

Comments
Add Comment