केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्या किल्ले रायगड दौरा
अलिबाग : रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिवपुण्यतिथीनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.
महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. मंत्री भरत गोगावले यांनी हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. प्रत्येकाने आपले काम चोखपणे बजवावे असे सांगितले. त्यावेळी गोगावले यांनी प्रत्येक विभागाकडून रायगडच्या पायथ्यापासून ते प्रत्यक्ष गडावर होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यामध्ये वाहनतळ, एसटी गाड्यांचे जाण्या-येण्याचे नियोजन, प्रमुख व आवश्यक ठिकाणी वीजपुरवठा, पिण्याचे पाण्याचे नियोजन, रोपवेच्या वापराच्या वेळा, गडाचा पायथा ते गडावरील कार्यक्रमा दरम्यानची आरोग्य सुविधा, तात्पुरती होणारी हेलिपॅड निर्मिती, रस्ते व दळणवळणाचे नियोजन या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून यातील त्रुटी व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडचे प्रभारी प्रांताधिकारी संदीपान सानप, तहसीलदार महेश शितोळे गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, इत्यादी प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, महावितरण, पंचायत समिती, पोलीस दल, महसूल विभाग, राज्य परिवहन, पशुवैद्यकीय विभाग, आरटीओ, रायगड रोपवे प्रशासन, आरोग्य विभाग, नगरपरिषद प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यांसह अन्य शासकीय, प्रशासकीय विभागांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन
रायगड किल्ल्यावर दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राजदरबारात श्री शिवप्रतिमा पूजन, सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह हे उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास अनेक मंत्री, खासदार व आमदार उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत. कार्यक्रमात श्री शिवपुष्पस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान व सरदार घराणे सन्मान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंगजी होळकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दौऱ्यादरम्यान ड्रोनसह हवाई उपकरणांवर बंदी
दौऱ्यात रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड व सुतारवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत दोन कि.मी. परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅडग्लायडर्स इत्यादींच्या वापरावर बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्यायसंहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.
खारपाडा ते कशेडीपर्यंत वाहतूक बंदी
या कार्यक्रमाकरिता नागरिक हे आपापली वाहने घेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या काळात अपघात व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ००.०१ ते दुपारी १५.०० वाजेपर्यत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी करण्याची अधिसूचनेव्दारे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पारित केले आहेत. सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहिका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहॆ.