पुणे : पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुण्यातील एका महिलेने पोटच्या जुळ्या मुलांना खर्च परवडत नसल्याने जीवे मारले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी ३५ वर्षीय महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊरमधील दत्तनगर भागातील काकडे वस्तीत राहणाऱ्या महिलेला लग्नाला १० वर्षे उलटूनही मुल होत नव्हते. या महिलेने मोठा खर्च करून टेस्ट ट्युब बेबीचा पर्याय निवडला. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या माहेरी दत्तनगर थेऊर येथे आल्या होत्या. टेस्ट ट्युब बेबीच्या माध्यमातून त्यांना दोन महिन्यांपूर्वी दोन जुळी मुले झाली. परंतु, त्यांची वाढ योग्यरीत्या होत नव्हती. मुलांची योग्य वाढ होत नसल्याने व त्याचा खर्च परवडत नसल्याने त्या तणावात होत्या. त्यातूनच त्या मंगळवारी सकाळी दोन्ही बाळांना घेऊन घराच्या छतावर गेल्या. त्यांनी छतावरील प्लास्टिकच्या टाकीमधील पाण्यात दोन्ही बाळांना बुडविले व स्वत: त्यात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
महिलेची धक्कादायक कृती शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बघितली. त्याने महिलेच्या भावाला आणि पोलिसांना कळवलं. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला मात्र दोन जुळ्या निष्पाप मुलांनी जीव गमावला. नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच, लोणीकाळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुले आणि महिलेला बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेला पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.