नारायण राणे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार
आज १० एप्रिल, माझा वाढदिवस त्याचं औचित्य साधून जनतेशी, कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, ज्यांनी मला घडवलं, नावारूपाला आणलं, त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्याशी बोलावंसं वाटतं.…
आज वयाची ७३ वर्षे पूर्ण करून मी ७४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यातील ५९ वर्षे सार्वजनिक जीवनात गेली. यातील फार मोठा काळ राजकारणात गेला. वयाच्या १५ व्या वर्षांपासून मी सार्वजनिक कामाला सुरुवात केली. आजवरच्या जीवनात विविध स्तरावर मी वेगवेगळ्या पदांवर कामे केली. मुंबई महापालिकेत नगरसेवक, बेस्ट उपक्रमाचा अध्यक्ष, विधानसभा व विधान परिषेदवर आमदार, अनेक वर्षे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, राज्यसभा खासदार, केंद्रीयमंत्री आणि आता लोकसभेत खासदार म्हणून काम करीत आहे. विधानसभेत ६ वेळा आमदार म्हणून निवडून आलो, विधिमंडळात सहा वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. सार्वजनिक जीवनात व राजकारणात काम करताना मला मिळालेल्या पदांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण त्या अगोदर १९९० मध्ये मी मुंबई महापालिकेत नगरसेवक असताना व बेस्ट समितीचा अध्यक्ष असताना मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी पाठविले. या निर्णयामुळे माझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडले. राज्यात व देशात मला जो नावलौकिक मिळाला, त्यामागे शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा हा निर्णय होता, हे मला सांगताना आजही अभिमान वाटतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. या जिल्ह्यातील जनतेने मला विधानसभेवर ६ वेळा आमदार म्हणून निवडून पाठवले आणि आता खासदार म्हणून लोकसभेत निवडून दिले. त्यामुळेच आमदार ते मंत्री, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, राज्यसभेत खासदार, केंद्रीयमंत्री व लोकसभेत खासदार ही सर्व पदे कोकणातील जनतेनेच मिळवून दिली, असे मी मानतो. कोकणातील जनतेने मला भरभरून प्रेम दिले, प्रत्येक वेळी मला भरघोस मतांनी निवडून दिले. मला कोणतेही पद मिळाल्यानंतर माझ्या कुटुंबीयांइतकाच कोकणी माणूस बेहोश होऊन मोठा आनंदी होत आला आहे. माझे संपूर्ण आयुष्य कोकणी माणसाच्या सेवेसाठी खर्च केले तरीही मी या जन्मी त्यांचे ऋण फेडू शकणार नाही.
आज मी ७३ वर्षांचा झालो. एवढे आयुष्य मी जगेन असे मला कधी वाटले नव्हते. पण माझ्या कुटुंबातील माझी पत्नी सौ. निलम, पुत्र निलेश आणि नितेश, सुना सौ. प्रियंका व सौ. रूतुजा, नातवंडे कुमार अभिराज, निमिष तसेच माझे असंख्य मित्र, या सर्वांचा उल्लेख करायचा म्हटले तर त्यांची नावे एका लेखात मावणारही नाहीत. मात्र तब्बल ६० वर्षे ज्यांनी माझी सोबत केली ते श्री. हनुमान परब व श्री. रवी शेंडगे यांचा उल्लेख करणे याप्रसंगी मला आवश्यक वाटते.
मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९९० नंतर मला दिलेल्या संधीचा उपयोग मी नेहमीच जनतेच्या कल्याणाकरिता सामाजिक, शैक्षणिक व विधायक कामांसाठी केला. या काळात कोकणचा खूप विकास झाला, आताही होत आहे, पुढेही होईल. कोकणाच्या विकासाची अशी चर्चा होते, त्यामध्ये माझ्या नावाचाही उल्लेख होतो. त्याचे सर्व श्रेय मी कोकणी माणसालाच देतो. सुरुवातीच्या काळात कोकणात अनेक सिंचन प्रकल्प मंजूर होते. पण ते प्रलंबिल होते किंवा कार्यरत नव्हते. सर्व सिंचन प्रकल्प नियमात बसवून सुरू करण्यासाठी मी प्राधान्य दिले. त्याचा परिणाम आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाई नाही. जिल्ह्यात चौपदरी हायवे झाले आहेत. कोकणात शिक्षण संस्थांची गुणवत्ता व दर्जा उत्तम आहे. दहावी-बारावीच्या निकालामध्ये कोकणातील मुले वर्षानुवर्षे पहिल्या यादीत येतात. निकाल कोकणात सर्वात चांगले लागतात. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, नागरी सेवा सर्वच बाबतीत कोकण आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी मी सुरुवातीपासून आग्रही होतो. त्यामुळेच १९९७ मध्ये सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा झाला. आता जिल्ह्यात विमानतळ झाले आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न अडीच लाखांवर आहे. मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात ते दीड लाखही नाही. पडवे, कुडाळ येथे उभारलेले ६५० बेडचे खासगी हॉस्पिटल गेली पाच वर्षे दर्जेदार सेवा देत आहे. तेथे सर्व प्रकारचे उपचार देण्यासाठी डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे. ७५० विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण (मेडिकल) घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात अव्वल दर्जाचे शिक्षण देणारे कॉलेज म्हणून या संस्थेचा उल्लेख होत आहे. १०० टक्के निकाल आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सेवा-सुविधा कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. कणकवली, हरकूळ गावाजवळ ५० एकर जागेत गेली पंचवीस वर्षे इंजिनीअरिंग कॉलेज सुरू असून १८०० विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. इथे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी अनेक खासगी कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर व चांगल्या हुद्द्यावर काम करीत आहेत. कणकवली, ओसरगाव येथे आठ एकर जागेवर महिला भवन उभारले आहे. तेथे महिलांना उद्योजिकतेचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मार्केटिंगचेही प्रशिक्षण दिले जाते. उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेकडून कर्जही मिळवून दिले जाते. ही व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. १९९० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच उत्तम नागरी सुविधा आहेत. उद्योजकांची संख्या वाढत आहे व त्यात महिलांचा सहभागही चांगला आहे. मला राज्यात व केंद्रात जी-जी पदे मिळाली, त्याचा उपयोग मी महाराष्ट्राच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी केला, हे सांगताना मला अभिमान वाटतो. जिल्ह्यातील विकासकामांना व उपक्रमांना जनतेचा विशेषत: तरुणांचा प्रतिसादही चांगला लाभला. सर्व जाती- धर्मांच्या लोकांनी मला प्रेम दिले व सहकार्य केले, या सर्वांचा मी ऋणी आहे. या सर्वांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.
वाढदिवसानिमित्त आज हजारोंकडून शुभेच्छा येतील. त्यांचा मी आभारी आहेच. पण शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. अमितभाई शहाजी व राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस या चार व्यक्तींमुळे नारायण राणे हा कोकणाला, महाराष्ट्राला व देशाला दिसला, मी या महान व्यक्तींचा ऋणी आहे. माझ्या आयुष्यात माझी पत्नी व दोन्ही मुले व कुटुंबीय यांचे मोठे योगदान आहे. माझ्या कामात ते मला सदैव सहकार्य करतात आणि माझी काळजीही घेतात. कुटुंबीय, कार्यकर्ते व मित्र परिवाराने केलेले सहकार्य, दिलेले प्रोत्साहन यातूनच वयाच्या ७३ वर्षांपर्यंत माझी वाटचाल झालेली आहे. या प्रवासात जसे असंख्य मित्र व सहकारी मिळाले तसेच राजकीय शत्रूंचाही अनुभव आला. आयुष्यात गोड अनुभव भरपूर मिळाले ,पण एकच कटू अनुभव मिळाला. महाआघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मा. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री या नात्याने कोणत्याही क्षेत्रात कोणताही विकास प्रकल्प आणू शकले नाहीत. पण एक भीम पराक्रम त्यांनी केला. ज्या शिवसैनिकाने ३९ वर्षे जीवाची पर्वा न करता, शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरेंच्या आज्ञेवरून शिवसेनेचे काम केले, शिवसेना कोकणात घराघरांत पोहोचवली, त्याच नारायण राणे यांचे मुंबईतील घर (अधिश) पाडण्याचा भीम पराक्रम उद्धव ठाकरे यानी केला…. माझ्या जीवनात माझ्यावर कोणी केलेले उपकार मी कधीच विसरत नाही, विसरलो नाही. तसेच माझ्यावर कोणी सूड उगवला, तर तेही मी कधी विसरत नाही. आज वाढदिवस. गोड आठवणींचा दिवस. म्हणून मी त्या कटू आठवणींविषयी अधिक बोलत नाही. जनतेने मला आयुष्यात भरभरून प्रेम व सहकार्य दिले, त्यामुळे मला जीवनात उत्तुंग स्थानावर पोहोचण्याची संधी मिळाली. माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा देव रामेश्वर, उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देवो व तुमच्या मनोकामना पूर्ण करो, ही प्रार्थना. चला, विकसित देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना साथ देऊ या, योगदान देऊ या, समृद्ध भारत घडवू या! जय हिंद, जय महाराष्ट्र!