अमरावती : अमरावती विमानतळावरून येत्या १६ एप्रिलपासून प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे, ही अमरावतीकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर अमरावतीहून पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे, याचा आपल्याला विशेष आनंद आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मार्ग १६ तारखेला अमरावतीला उघडणार आहे. अमरावती-मुंबई या विमानसेवेनंतर इतर ठिकाणीही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. अमरावती-दिल्ली विमानसेवा देखील सुरू करणार आहोत, असे आश्वासन महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी येथे दिले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावतीहून आता नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी अमरावतीला येत आहोत. अमरावतीला विमानसेवेची सुविधा आवश्यक होती, ती आता पूर्ण झाली आहे. पश्चिम विदर्भाच्या विकासाचे दार खुले होणार आहे. आपला महाराष्ट्र, विदर्भ विकसित झाला पाहिजे, हे स्वप्न डॉ. पंजाबराव देशमुख यांनी बघितले होते. विशेषत: कृषी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती.
बावनकुळे म्हणाले, मी देखील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. माझे शिक्षण या संस्थेच्या शाळेतच झाले आहे. माझ्याकडे महसूल विभाग आहे. संस्थेसाठी जमीन देण्यास मी तयार आहे. संस्थेसाठी एकाच ठिकाणी शैक्षणिक संकुल उभारायचे असेल, तर त्यासाठी देखील सरकार मदत करण्यास तयार आहे. या शिक्षण संस्थेला आधुनिक संसाधनांची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली, ती निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल.