हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट

मुंबईत ७५ हजार पेटी हापूसची आवक


मुंबई(प्रतिनिधी) : हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर वाया गेला आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोहोरापासून तयार झालेले आंबे बाजारात आहेत. एप्रिलअखेर हापूसची आवक चांगली राहील. पण, मे महिन्यात आवक आणि बाजारातील उपलब्धता कमी होणार आहे. आंब्याला तीन टप्प्यात मोहोर येतो.


पहिल्या टप्प्यात नोव्हेंबरमधील थंडीत मोठ्या प्रमाणावर मोहोर येतो. यंदा अपेक्षित थंडी पडली नाही. त्यात नर फुलांचे प्रमाण वाढल्यामुळे फळधारणा झाली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर पूर्णतः वाया गेला. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आला. आता मिळणारे आंबे डिसेंबरमधील मोहोरपासून मिळत आहेत. जानेवारीमध्ये येणाऱ्या तिसरा टप्पातील मोहोर वाढलेल्या तापमानामुळे वाया गेला आहे. जानेवारीतील मोहोरापासून मे महिन्यात आंबा मिळतो. त्यामुळे यंदा मे महिन्यात बाजारात कोकणातील हापूसची आवक कमी राहील. बाजारातील उपलब्धता कमी होऊन दरवाढ होऊ शकते, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा फळबागातदार संघाचे सदस्य विलास ठाकूर यांनी दिली.


नोव्हेंबर महिन्यात चांगला मोहोर येण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून पाऊस न पडणे आणि नोव्हेबरमध्ये चांगली थंडी गरजेचे असते. यंदा नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस पडत राहिला. थंडीही अपेक्षित पडली नाही. त्यामुळे मोहोर येण्यासाठी पोषक हवामान मिळाले नाही. मोहोर येण्याच्या काळात झाडांना पालवी फुटली. त्यानंतरही तापमान वाढ झाली. रात्रीच्या आणि दिवसांतील तापमानात १५ अंश सेल्सिअसहून जास्त फरक राहिला. त्यामुळे लहान फळे करपून गळून पडली.


अवकाळी पावसामुळे फळांवर काळे डाग पडत आहे. फळमाशीचा प्रार्दुभाव वाढून आंब्याचे नुकसान वाढले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान वाढल्यामुळे आंबे कमी दिवसांत पक्व होऊन काढणीला आले आहेत. त्यामुळे बाजारात हापूसची आवक वाढली आहे. यंदा कोकणात हापूसचे उत्पादन सरासरीच्या जेमतेम ३० ते ३५ टक्केच होईल, अशी माहिती कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली.


मुंबईत ७५ हजार पेटी हापूसची आवक


मुंबई बाजार समितीत कोकणातून गुरुवारी ७५ हजार पेटी हापूसची आवक झाली. सध्या १००० ते ३००० पेटीचा दर आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत आंबाची आवक सरासरीपेक्षा कमी राहिली. एप्रिलमध्ये सरासरी इतकी आवक राहील. मे महिन्यात फारशी आवक होणार नाही. गुजरातमध्येही आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मे महिन्यात दर चढे राहतील, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

Comments
Add Comment

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक