
लखनऊ : लखनऊ मधील आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेची ३० महिन्यात २५ वेळा प्रसूती झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदीही झाली. तरीही महिला गर्भवती राहिल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात एक महिला ३० महिन्यात २५ वेळा आई झाली. याच कालावधीत तिची ५ वेळा नसबंदी झाली. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवतींना प्रसुतीनंतर १४०० रुपये, तर शहरातील गर्भवतींना १ हजार रुपये दिले जातात. महिलांना नसबंदीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होते. उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात आर्थिक ऑडिट सुरु असताना हा घोटाळा उघडकीस आला. या महिलेला २५ वेळा प्रसुती आणि ५ वेळा नसबंदी करण्यासाठी ४५ हजार रुपये देण्यात आले.
/>
या सगळ्या घोटाळ्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या अधीक्षकांच्या भूमिकेचीही चौकशी होणार आहे. आग्र्याचे मुख्य आरोग्य अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी या प्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. यामध्ये तांत्रिक चूक झाली आहे की जाणूनबुजून याबाबत संपूर्ण चौकशी श्रीवास्तव यांच्याच कडक देखरेखेखाली केली जाणार आहे.