Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजShirdi News : भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा

Shirdi News : भिक्षुक मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! “मयत भिक्षुक नव्हतेच”; नातेवाईकांचा दावा

शिर्डी : शिर्डी येथे पोलिसांनी केलेल्या भिक्षुकांवरील कारवाईनंतर उडालेल्या गोंधळात आता नवे वळण आले आहे. कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या दहा जणांपैकी चार जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांनी आता थेट प्रशासनावर आणि रुग्णालय व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. “मृत्यू झालेली व्यक्ती भिक्षुक नव्हतीच, प्रशासनाच्या चुकीच्या ओळखीमुळे आणि उपचारातील हलगर्जीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला,” असा दावा नातेवाईकांनी केला आहे.

शिर्डीत अलीकडे भिक्षुकांमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबवत तब्बल ५० जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर काही जणांना श्रीगोंद्याजवळील विसापूर येथे हलवण्यात आले, तर दहा जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून, दोनवर सध्या उपचार सुरू आहेत. उर्वरित चार जण रुग्णालयातून पळून गेले.

Ahilyanagar News : शिर्डीत पकडलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रूग्णालयात मृत्यू

दरम्यान, मृतांपैकी दोन जणांची ओळख पटल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “आमचे नातेवाईक हे भिक्षुक नव्हतेच. त्यांनी काम करून उदरनिर्वाह चालवला होता. प्रशासनाने कोणतीही योग्य तपासणी न करता त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि नंतर रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांची अत्यंत अमानुष वागणूक झाली.”

नातेवाईकांचा आरोप आहे की रुग्णांना पाण्याविना ठेवले गेले, हातपाय बांधून ठेवण्यात आले आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून कोणतीही योग्य निगा राखली गेली नाही. “ही थेट प्रशासनाची चूक असून आमच्या नातेवाईकांचा मृत्यू हा त्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली.

विसापूर येथील भिक्षेकरी गृहात मयत झालेले शिर्डी जवळील पिंपळस येथील सारंगधर वाघमारे व शिर्डीतील इसार शेख यांच्या नातेवाईकांनी या दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बुधवारी शवविच्छेदन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पार्थिवासह शिर्डी पोलीस ठाणे गाठले. हे भिक्षेकरी नसतांना त्यांना पोलीस, नगरपालिका व साईसंस्थानने पकडले. कोर्टाने त्यांना तिकडे विसापूरला पाठवले. तिथे त्यांना बांधून ठेवण्यात आले, अन्न पाणीही देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करत याला संबंधित यंत्रणा जबाबदार आहेत, याप्रकरणी फिर्याद दाखल करा, अशी नातेवाईकांची मागणी केली.

आमचा बाप जिवंत नेला, जिवंत आम्हाला परत द्या अशी आर्त भावना वाघमारे यांच्या मुलगा, मुली व नातेवाईकांनी व्यक्त केली. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हंबरडा फोडला. त्यांच्या बरोबर बौद्ध भिक्खु पण ठाण्यात आले होते.

पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी यासंदर्भात पंचनामा व शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याचे फिर्याद दाखल करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे उपस्थित होते.

रिपाईची जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, नाशिकचे अॅड राहुल तूपलोंढे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी नातेवाईकांच्या भावना तीव्रतेने व्यक्त केल्या.

शिर्डी पोलीस ठाण्यात बुधवारी मयत शेख व वाघमारे यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस ठाण्यासमोर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.

या प्रकारामुळे आता शिर्डीमधील प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. प्रशासन यावर कोणती भूमिका घेते आणि शिर्डीकर यावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -