महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरण कामांचा वेग वाढण्याच्या दृष्टीने रेडी मिक्स काँक्रिटची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अधिक मजबूत करून त्यासाठी प्रकल्प चालक आणि रस्ते कामांचे कंत्राटदार यांनी आपापसात समन्वयाने त्वरित कार्यवाही करावी. तसेच, एफ उत्तर विभागात बहुतांशी पदपथांखाली जलवाहिन्या आहेत. ही बाब लक्षात घेता ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सोबत पदपथाची कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण होणार असेल, तेवढ्याच लांब अंतराच्या जलवाहिन्या अंथरण्यात याव्यात. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या.
मुंबईकरांच्या सुलभ आणि जलद प्रवासासाठी मुंबई शहर विभागात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे अहोरात्र व वेगाने सुरू आहेत. रस्ते काँक्रिटीकरण अंतर्गत शीव (पूर्व) येथील रस्ता क्रमांक २७ वरील काँक्रिटीकरण कामाची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री उशिरा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील मीलन रोड बिल्टेक एलएलपी या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पाला देखील बांगर यांनी आकस्मिक भेट दिली.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्त्यांची सुरू असलेली कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण व्हायला हवीत, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या कामांची सद्यस्थिती पाहण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) बांगर हे मुंबई शहरासह पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या रस्ते कामांना प्रत्यक्ष भेट देत आहेत. तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आय. आय. टी. मुंबई) चमू, गुणवत्ता देखरेख संस्थेचे (क्यू.एम.ए.) प्रतिनिधी या दौऱ्यांमध्ये सोबत असतात. याचाच एक भाग म्हणून काल एफ उत्तर विभागात शीव (सायन) (पूर्व) परिसरात पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्याप्रसंगी रस्ते काँक्रिटीकरण कसे केले जात आहे, त्याचे संपूर्ण प्रात्यक्षिक बांगर यांनी पाहिले. काँक्रिटीकरण सुरू होण्यापूर्वी केलेली पायाभरणीची कामेही त्यांनी बारकाईने पाहिली. तसेच संबंधित अभियंत्यांकडून कार्यवाहीचा सविस्तर तपशील जाणून घेतला.
एफ उत्तर विभागात बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या या पदपथांखाली असल्यामुळे प्रत्यक्ष वाहतूक मार्ग (कॅरेज वे) कामात अडथळा येत नाही, अशी माहिती संबंधितांनी दिली. असे असले तरी जे रस्ते व पदपथ ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण होणार असतील तेवढ्याच लांबीच्या जलवाहिन्या अंथरण्यात याव्यात. यासाठी जलअभियंता विभागाशी योग्य तो समन्वय साधावा. कोणत्याही स्थितीत संबंधित रस्ते व पदपथ हे ३१ मे २०२५ पूर्वी गुणवत्ता राखून पूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचनाही बांगर यांनी दिल्या. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहयोगी प्राध्यापक सोलोमन देबबर्मा, उपप्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) (शहर विभाग) अंकुश जगदाळे यांच्यासह संबंधित अधिकारी आदी या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते.