अहिल्यानगर : शिर्डीत सध्या चोरांसोबत भीक मागणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर हे भिक्षेकरी शिर्डीत येणाऱ्या भाविकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शिर्डीत वारंवार पोलिसांची कारवाई सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. यात काही जण इंग्रजी बोलत पैसे मागत असल्याचं दिसून आलं आहे. मात्र या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एका जणाने आपण इस्रोमधील माजी अधिकारी असल्याचा दावा केलाय. या घटनेने पोलीसही आवाक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने सण-उत्सव काळात भिकाऱ्यांची धरपकड मोहीम राबविली जाते. या काळात शिर्डीत साईभक्तांना त्रास देणाऱ्या ५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ४ एप्रिल रोजी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी १३ जणांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित भिक्षेकऱ्यांची रवानगी विसापूर येथील कारागृहात करण्यात आली. रुग्णालयात दाखल केलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी चार जणांचा मृत्यू झाला. या ५० भिक्षेकऱ्यांमध्ये काही भिक्षेकरी फाडफाड इंग्लिशमध्ये बोलत पैसे मागत असल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणी चौकशी केल्यावर एका भिक्षेकऱ्याने इस्रोमधील माजी अधिकारी असल्याचं सांगितलं. याशिवाय आपण इस्रोमध्ये चांद्रयान मोहिमेत काम केल्याचा दावाही त्यानं केला आहे. या भिक्षेकऱ्याचं नाव के. एस. नारायण (वय ६० ) असल्याचं समजतंय. तो २००८ साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून नियमित शिर्डीला येत आहे; मात्र यावेळी नाशिकमध्ये पैसे चोरीला गेल्याने शिर्डीत पैसे मागत असल्याचे त्याने सांगितले. याबाबत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी माहिती दिली.