Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीभांडुप आणि कुर्ला परिसरातील ५० महिलांना प्रवासी रिक्षाचे वाटप

भांडुप आणि कुर्ला परिसरातील ५० महिलांना प्रवासी रिक्षाचे वाटप

महापालिकेच्यावतीने मोफत प्रशिक्षण आणि परवाने देण्यात आले होते

रिक्षांसाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका, केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले. या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत.

कुर्ला येथील नेहरू नगरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या ५० रिक्षांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘वुमेन्स ऑन व्हिल’ या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत या रिक्षांचे वितरण करण्यात आले. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला टिव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रिती सावंत आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

मुंबईतील होतकरू महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून आता महिलांना बँकांकडून कमी व्याजदरावर या रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या. या रिक्षांतून महिला प्रवाशी वाहतूक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, आवश्यक परवाने, रिक्षा नोंदणी बिल्ला इत्यादी सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत. रिक्षा चालक लाभार्थी सविता तावरे यांनी स्वतः रिक्षा चालवत दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि आमदार मंगेश कुडाळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आणले.

मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्प अंतर्गत महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण तसेच शिकाऊ परवाना, कायमस्वरूपी परवाना, वाहन नोंदणी, परवाना आणि परवाना प्रमाणपत्र (परमिट) या सुविधा मोफत देण्यात आल्या. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे. या उपक्रमासाठी नारी शहर समूह, टीव्हीएस मोटर कंपनी आणि सीजी कॉर्पोरेशन यांचे सहकार्य लाभले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -