मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे येथील खेरवाडी सिग्नल येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगला आरोपी ठेवण्यात आले असून मुंबई गुन्हे शाखेने एकूण २६ जणांना अटक केली होती. परंतु कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्यात यश येत नव्हते. मात्र आता या हत्येप्रकरणातील मास्टरमाईंडला पंजाब पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Dombivali : डोंबिवलीत मराठीवरुन वाद! महिलेने ‘एस्क्युज मी’ बोलताच तरुणांकडून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना अटक करुन त्यांची चौकशी केली होती. तेव्हा मुख्य कट रचणाऱ्या शुभम लोणकर, झीशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांची नावे समोर आली. यामधील झीशान अख्तर (Zeeshan Akhtar) फरार झाला असून मंगळवारी पंजाबमधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात झिशान अख्तरसह त्याच्या गँगमधील दोन जणांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.
पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला
पंजाब भाजपाचे माजी अध्यक्ष मनोरंजन कालिया यांच्या जालंधर येथील घरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही, परंतु घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि कार-दुचाकींचे नुकसान झाले. पोलिसांनी या घटनेलसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदार ठरवले.
कोण आहे झिशान अख्तर?
झीशान हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा ९ गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. ७ जून २०२४ रोजी जीशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. गँगस्टर लॉरेन्सच्या सूचनेनंतर झीशानने बाबा सिद्दिकीची हत्या केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झिशान गुन्हेगार बनला. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती.