मुंबई : राज्यातील पाच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मंगळवार ८ एप्रिल रोजी बदल्या करण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका अर्थात केडीएमसीच्या आयुक्तपदाची जबाबदारी तीन वर्षे इंदुराणी जाखड यांनी हाताळली. त्यांची एक एप्रिल रोजी पालघर जिल्हाधिकारीपदी बदली झाली. यानंतर रिक्त झालेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी अभिनव गोयल यांची नियुक्ती झाली आहे. इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर आठवड्याभरात केडीएमसीला नवे आयुक्त मिळाले आहेत.