Thursday, April 17, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखवाजपेयी ते मोदी...

वाजपेयी ते मोदी…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ज्याची नोंद झाली आहे, अशा भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) ४५ वर्षांच्या इतिहासात अनेक चढ-उतार आले. भाजपाची स्थापना दि. ६ एप्रिल १९८० मध्ये झाली, पण या पक्षाची नाळ १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाशी जोडलेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या सरकारमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे सदस्य होते. पण काँग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्ष राजनीती व मुस्लिमांचे लांगूलचालन याच्या ते सुरुवातीपासून विरोधात होते. डॉ. मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली व राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवादी विचारधारेला त्यांनी उत्तेजन दिले. १९५२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनसंघाचे केवळ तीन खासदार निवडून आले होते. १९७७ पर्यंत भारतीय जनसंघ पक्ष संसदेत नगण्य होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ मध्ये देशात आणीबाणी लागू केली व त्याला भारतीय जनसंघाने जोरदार विरोध केला. अठरा महिने भारतीय जनसंघासह देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांचे शेकडो नेते व हजारो कार्यकर्ते जेलमध्ये होते. १९७७ मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणी मागे घेतली आणि देशात लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. त्या वेळी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून जनता पक्षाची स्थापना केली. केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, पण अंतर्गत लाथाळ्या, गटबाजी, अहंकार आणि जनता पक्षातील पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांच्या दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावरून समाजवाद्यांनी घेतलेला आक्षेप, यामुळे मोरारजी देसाई सरकार अडीच वर्षांतच कोसळले. जनसंघीयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवता कामा नयेत अशी भूमिका मधू लिमये व अन्य समाजवादी नेत्यांनी घेतली होती. जनसंघातील नेत्यांनी त्याला धूप घातली नाही. जनता पक्षात फूट पडली. पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघातील नेत्यांनी स्वतंत्र मार्गावर जाण्याचे ठरवले आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.

भाजपाचे पहिले अध्यक्ष म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांची निवड झाली. सुरुवातीच्या काळात भाजपाला फारसे यश लाभले नाही. पण राम जन्मभूमी आंदोलन सुरू झाले आणि भाजपाला यशाचा मार्ग सापडला. राम जन्मभूमी आंदोलनानेच भाजपाला दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले. देशाच्या राजकारणात भाजपाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. १९९० सालापर्यंत भाजपा-काँग्रेस पक्षाला केंद्रात आणि विविध राज्यांत सत्तेवरून उलथवून टाकेल असे कोणत्याही ज्योतिष्याने भविष्य वर्तवले नव्हते. लाखो कार्यकर्त्यांची मेहनत, अमितभाईं शहा यांचे संघटन कौशल्य आणि नरेंद्र मोदींचा करिष्मा यातून आज देशात २० हून अधिक राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. सोळा राज्यांत भाजपाचे स्वत:चे सरकार आहे. अटल-अडवाणी कमल निशान, माँग रहां हैं हिंदुस्थान…, राज तिलक की तैयारी करों, आ रहें है, भगवाधारी… मंदिर वही बनाएंगे, अशा घोषणा देत अटल-अडवाणींच्या काळात भाजपाने दिल्लीकडे वाटचाल केली. गेल्या अकरा वर्षांपासून भाजपामध्ये मोदी-शहा यांचे पर्व सुरू झाले आहे. घर घर मोदी-हर हर मोदी, जो राम को लाएं हैं, हम उनको लाएंगे अशा घोषणातून देशभर भाजपाचा विस्तार झालाय. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींच्या काळात भाजपा मित्रपक्षांच्या शोधात होती, आता देशात भाजपा केंद्रस्थानी राहणार हे देशातील सर्व प्रादेशिक पक्षांना कळून चुकले आहे. स्वबळावर केंद्रात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचा पराक्रम मोदींनी करून दाखवला. सन २०१४ मध्ये लोकसभेत भाजपाचे २८२ खासदार निवडून आले, तर २०१९ मध्ये भाजपाचे ३०३ खासदार विजयी झाले. सन २०२५ मध्ये अब की बार चार सौ पार हे भाजपाचे स्वप्न होते पण ते भंगले. २०२४ मध्ये भाजपाचे सर्वाधिक म्हणजे २४० खासदार निवडून आले व मित्रपक्षांच्या मदतीने लोकसभेत २९३ आकडा गाठला व सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले.

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन तर केलीच. पंडित नेहरूंनंतर हॅटट्रीक साधणारे देशाचे दुसरे पंतप्रधान अशी त्यांची इतिहासात नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची हिम्मत आणि लोकप्रियता, अमितभाई शहांची चाणक्यनीती, आदित्यनाथ योगींचे आक्रमक हिंदुत्व यातून भाजपाचा अश्वमेध देशभर आज दौडताना दिसतो आहे. पण या ४५ वर्षांच्या वाटचालीत अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदींची तपस्या, धैर्य व त्याग यांचे मोठे योगदान आहे. अडवाणी यांच्या राम रथयात्रेने व जोशींच्या तिरंगा यात्रेने पक्षाला देशपातळीवर नेले व पक्षात नवचैतन्य निर्माण केले. देशात अनेक राजकीय पक्ष आहेत की, त्यांच्यात वारंवार फाटाफूट झाली किंवा विभाजन झाले. भाजपा हा एकच पक्ष आहे की, तो सर्वत्र विस्तारत असतानाही अभंग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून तयार झालेले कार्यकर्ते हा भाजपाचा मुख्य आधार आहे. तो कधी विचलीत होत नाही, निष्ठा बदलत नाही. त्याला सत्तेचा मोह नाही. त्याची बांधिलकी विचारांशी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अयोध्येत भव्य राम मंदिर उभारून भाजपाने सर्व देशांतील कोटी कोटी जनतेची इच्छा पूर्ण केली. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार दिलेल्या घटनेतील ३७० व्या कलमाचे सुरक्षा कवच काढून घेतले, लोकसभा-विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजूर करून घेतला, वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभारावर लगाम घालणाऱ्या कायद्यात सुधारणा केली, तिहेरी तलाक पद्धत रद्द करून लाखो मुस्लीम महिलांना दिलासा दिला. राष्ट्रवाद व सांस्कृतिक एकता या विचारांना भाजपाने नेहमीच प्राधान्य दिले. एनडीएमधील जुन्या मित्र पक्षांबरोबरच नव्याने एनडीएमध्ये आलेल्या मित्रपक्षांना सन्मान देण्यासाठी भाजपाला अनेकदा कसरत करावी लागते आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते व भाजपाचे केवळ दोनच खासदार विजयी झाले. दोन खासदारांपासून भाजपाची सुरुवात झाली आणि गेल्या तीन निवडणुका सर्वाधिक खासदारांचा पक्ष म्हणून भाजपाने संसदेत स्थान मिळवले आहे.

अटलबिहारी वाजपेयी हे (१९८० ते १९८६) भाजपाचे पहिले अध्यक्ष होते व देशाचे तीन वेळा पंतप्रधान झाले. लालकृष्ण अडवाणी हे (१९८६ ते ९१, १९९३ ते ९८, २००४-२००५) तीन वेळा पक्षाचे अध्यक्ष होते, देशाचे गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. मुरली मनोहर जोशी (१९९१-९३), कुशाभाऊ ठाकरे (१९९८-२०००), जना कृष्णमूर्ती (२००२-२००४), वेंकय्या नायडू (२००२- २००४), नंतर उपराष्ट्रपती झाले. नितीन गडकरी(२००९-२०१३) पक्षाचे अध्यक्ष होते व केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री आहेत. अमितभाई शहा हे २०१४ ते २०२० पक्षाचे अध्यक्ष होते, केंद्रीय गृहमंत्री आहेत. जगत प्रसाद नड्डा हे पक्षाचे विद्यमान अध्यक्ष असून केंद्रीय आरोग्यमंत्री आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्याएवढी उत्तुंग लोकप्रियता देशातील अन्य कोणा राजकीय नेत्याला लाभली नाही. गेल्या वर्षी ५४३ जागांसाठी झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून २०२४ रोजी झाली आणि भाजपाप्रणीत एनडीएच्या २९३ खासदारांचे समर्थन घेऊन नरेंद्र मोदी देशाचे सलग तिसऱ्यादा पंतप्रधान झाले. आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम व बिहारमधील नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या दोन प्रमुख पक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दिलेला आहे. लोकसभेत भाजपाचे २४० व राज्यसभेत ९८ खासदार आहेत. देशभरातील विधानसभांमध्ये भाजपाचे १६५६ व विधान परिषदांमध्ये १६५ आमदार आहेत. देशभरात २५ कोटी सदस्य संख्या नोंदविण्याचे लक्ष्य भाजपाने ठरविले आहे.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -