पाण्याची बिले तसेच त्यावर आधारीत सेवा पूर्णपणे बंद
मुंबई (खास प्रतिनिधी) : ‘ॲक्वा’ जलआकार प्रणालीच्या सर्व्हरवरील माहिती क्लाऊड सर्व्हरवर स्थानांतरीत करण्याचे कामकाज मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे बुधवारी ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते मंगळवारी १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत जल अभियंता विभागाची ‘ॲक्वा’ ही जलआकार देयके व संकलन प्रणाली तसेच तिच्यावर आधारित इतर सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रातील जलआकार भरणा, ऑनलाईन जलआकार भरणा तसेच ‘ॲक्वा’ प्रणालीशी संबंधीत सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच महानगरपालिका संकेतस्थळावरील जलआकार संबंधीत कोणतीही माहिती या कालावधीत उपलब्ध नसेल.
सध्या अस्तित्वात असलेल्या ‘ॲक्वा’ प्रणालीच्या परिरक्षण व सुधारणेकरीता कामकाज हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त नमूद कालावधीत ‘ॲक्वा’ जलआकार देयक व संकलन प्रणाली संपूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.