आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी महापालिकेकडून पुढाकार
मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या जाणाऱ्या मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे ब्रीदवाक्य ‘निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य’ (Healthy beginnings, hopeful futures) असे आहे. तर महानगरपालिकेच्या अभियानाचे घोषवाक्य ‘स्वस्थ रहा, मस्त रहा’ असे असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.
आजच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत ‘मीठ व साखर जनजागृती’ या अभियानाचा शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सोमवारी ७ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आला. याप्रसंगी ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियानाच्या भित्तीफलकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी (सार्वजनिक आरोग्य) डॉ. दक्षा शहा, मुख्य वैद्यकीय अधिक्षक (उपनगरीय रूग्णालये) डॉ. चंद्रकांत पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.
भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा (NCDs) प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळा येथे अतिरिक्त मीठ व साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाईल.
विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येते. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून व मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या (मीठ जनजागृती अभियानाचा आठवडा (Salt Awareness Week) च्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटीज (Partnership for Healthy Cities) आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (Americares India Foundation) यांच्या सहकार्याने “मीठ व साखर जनजागृती” अभियान राबविण्यात येणार आहे.
“हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा”
जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे २०२१ नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये ३४% उच्च रक्तदाब आणि १८% मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. मीठ आणि साखर आपल्या अन्नामध्ये चवीसाठी वापरल्या जाणाऱया सामान्य घटकांपैकी एक आहे. मीठ व साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित “५ ग्राम” मिठापेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. तर मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.