मुंबई : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बँक, दुकानं आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही ते तपासायचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये जावून मराठी भाषेचा आग्रह धरला. या दरम्यान काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनी मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी अशा कर्मचाऱ्यांना चोपही दिला.
या घटनेमुळे अमराठी बँक कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्या आग्रहानंतर संबंधित आंदोलन मागे घेण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
सुनील शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत मनसे कार्यकर्ते हिंदी भाषिकांवर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत, असा देखील आरोप याचिकेत करण्यात आला आहे. तसेच मनसेची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेनंतर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमराठींकडून मराठी भाषिकांवर हल्ला होण्याच्या घटना देखील घडल्या. तसेच एका टेलिफोन कंपनीच्या गॅलरीत गेल्यावर तिथल्या महिला कर्मचान्याला ग्राहकाने मराठीत बोलण्याचा आग्रह केला तेव्हा तिने मराठी येत नाही, असं म्हटलं. अशा बऱ्याच घटना घडल्या. या घटनांवरुन मनसे आक्रमक झाली. मनसेकडून नेहमी मराठी भाषेसाठी विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत.