आतापर्यंत ३३ हजार ५२७ महिलांनी घेतला या सुविधेचा लाभ
प्रसूतीपूर्व काळजी आणि नियमित अंतराने समुपदेशन
मुंबई (खास प्रतिनिधी) : सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या संस्थात्मक प्रसूतीपर्यंत (Institutional delivery) प्रसूतीपूर्व काळजी व नियमित अंतराने समुपदेशन करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने माँ मित्र हेल्पडेस्क उभारण्यात आला आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून ३३ हजार ५२८ गर्भवती महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या किलकारी या कार्यक्रमाअंतर्गत सर्व नोंदणीकृत गर्भवती महिलांना विना मूल्य स्वयंचलित व्हॉईस कॉल आणि एसएमएससच्या माध्यमातून समुपदेशन केले जात अहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या उपस्थिती माँ-मित्र प्रकल्पअंतर्गत गरोदर महिला आणि बालकांसाठी सेवा अधिक सक्षम करण्याच्या अनुषंगानेही जनजागृती अभियानाअंतर्गत भित्तीफलकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले.
मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातील ११ आरोग्य सुविधांमध्ये (०३ वैद्यकीय महाविद्यालये, ०२ प्रसूतीगृहे, ०६ सर्वसाधरण रूग्णालय) ‘मा-मित्र हेल्पडेस्क’ उपक्रम जुलै २०२४ पासून अरमान बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या संस्थात्मक प्रसूतीपर्यंत प्रसूतीपूर्व काळजी व नियमित अंतराने समुपदेशन करण्यात येते. तसेच मातांना एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या संपूर्ण लसीकरणासाठीही कॉल केले जातात.
तसेच अतिजोखमीची परिस्थिती असलेल्या गर्भवती महिलांच्या उपचारांचे पालन, ट्रॅकिंग आणि फॉलोअप साठीचा तपशील संबंधित हेल्थ पोस्टला पाठविण्यात येते. मुंबईत सेवेमार्फत आजमितीस ३३ हजार ५२८ गर्भवती महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या किलकारी या कार्यक्रमाअंतर्गत सर्व नोंदणीकृत गर्भवती महिलांना विना मूल्य स्वयंचलित व्हॉईस कॉल आणि एसएमएससच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. या प्रकल्पामुळे मुंबईतील निरोगी आई आणि निरोगी बाळाचे ध्येय साधण्याचे ध्येय साध्य होईल.
गर्भधारणा झाली असे कळताच संबंधित गरोदर महिललेने नजीकच्या आरोग्य केंद्रात नोंदणी करावी व प्रसूतीपूर्व देखभाल विषयी माहिती करून घ्यावी. गर्भवती मातांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
रक्तक्षय जनजागृतीसाठी लाल रंग कमाल मोहीम
मुंबई महानगरपालिकेमार्फत गरोदर मातांमधील रक्तक्षय कमी करण्याबाबत “लाल रंग कमाल रंग” ही मोहीम राबविण्यात येत आहे. माता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे. सोमवारी ७ एप्रिल २०२५ रोजी साजरा होणारा जागतिक आरोग्य दिन, माता आणि नवजात शिशूंच्या आरोग्याबाबत वर्षभर चालवणाऱ्या मोहिमेची सुरुवात असेल.