मुंबई : एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये उन्हाने अक्षरशः कहर केला आहे. सोमवारी मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचले तर ठाण्यात पारा थेट ४० अंशांवर गेला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बहुतांश भागांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असून, मुंबई शहराचाही पारा ३६ अंशांवर स्थिरावल्याचे नोंदवण्यात आले आहे. रविवारीच्या तुलनेत तापमानात २ अंशांची वाढ झाली असून ही वाढ पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे झाली आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
Grand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?
हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत तापमान ४० ते ४१ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून मात्र तापमानात थोडीशी घट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तोपर्यंत शहर उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाखालीच राहणार आहे.
या उष्णतेच्या लाटेची सुरुवात फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच झाली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमान ३५ अंशांपर्यंत स्थिर होते. मात्र गेल्या आठवड्यापासून आकाशातील मळभ दूर झाल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम जाणवू लागला आहे. त्यातच समुद्रकाठावरील आर्द्रतेमधील चढउतार आणि समुद्री वाऱ्यांचा अभाव यामुळे मुंबईकरांची तगमग वाढली आहे.
याचवेळी गुजरातमधून वायव्य दिशेने येणाऱ्या गरम वाऱ्यांनीही परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे. या गरम वाऱ्यांचा प्रवाह मुंबईकडे वळला असून, त्यामुळे शहराच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत ही उष्णता अधिक जाणवण्याची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.