माजी क्रिकेटपटू केदार जाधव तसेच मनसे, काँग्रेस, उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश
मुंबई : काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांमुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा येत आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळी बावनकुळे बोलत होते. ओबीसी कल्याण, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, खा. अशोक चव्हाण, आ. अतुलबाबा भोसले, आ. समाधान आवताडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस संदीप गिड्डे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी सातारा, कराड, हिंगोली, नांदेड, वसमत येथील काँग्रेस, सांगली येथून मनसे, कॉंग्रेस आणि उबाठा शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केला. बावनकुळे आणि चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याने प्रभावित होऊन माजी क्रिकेटपटू तसेच सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व केदार जाधव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपासाठी केदार यांचा पक्षप्रवेश हा आनंदाचा क्षण आहे त्यांच्याकडील सांघिक भावना, कौशल्य पक्षाला ताकद देईल असेही त्यांनी नमूद केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेकजण भाजपामध्ये येण्यास उत्सुक असून भाजपामध्ये नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांनी भाजपाचे सक्रीय सदस्य होऊन पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.
आ. अतुलबाबा भोसले यांच्या पुढाकाराने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कराड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मलकापूर नगरपालिकेचे शिक्षण व नियोजन सभापती तसेच माजी बांधकाम सभापती शंकरराव चांदे, मलकापूर शहर अध्यक्ष तसेच माजी नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, सतीश चांदे, मलकापूर शहर रोटरी क्लब अध्यक्ष धनाजी देसाई यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसमत, परभणी, हिंगोली येथील भाजपामध्ये प्रवेश केलेल्या उबाठा, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये वसमत माजी नगराध्यक्ष शशीकुमार कुलथे, मुरली कदम, राजेंद्र कदम, संजय क्षीरसागर, हिंगोली काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव लता जाधव, प्रदेश महिला काँग्रेस सचिव अनिसा शेख, पौर्णिमा राणे, शारदा भस्मे यांसह अनेकांचा समावेश आहे.
संदीप गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा मनसे उपाध्यक्ष धनंजय शिंदे, मनसे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष कुमार जाधव, हणमंत शिंदे, सचिन गायकवाड, आकाश तेली, आकाश सावडकर, उबाठाचे मनोज चव्हाण, प्रहार शेतकरी संघटना सांगली जिल्हा उपाध्यक्ष रणजीत माने, जितेंद्र माने यांसह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.