मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी, चित्रपट निर्माती व लेखिका ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) ७ वर्षांपूर्वी ब्रेस्ट कॅन्सरवर मात केली होती. मात्र आता दुर्दैवाने तिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. आता पुन्हा एकदा तिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. ताहिराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. तसंच यावेळीही हिंमतीने याचा सामना करणार असा तिने विश्वास दर्शवला आहे.
ताहिराने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिला पुन्हा कर्करोग झाल्याची माहिती तिने दिली आहे. “सात वर्षांच्या नियमित तपासणीची शक्ती. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना नियमित मॅमोग्रामची गरज आहे, त्या सर्वांना मी हेच सुचवेन. माझ्यासाठी दुसरा राउंड…मला पुन्हा कर्करोगाचं निदान झालंय,” असं ताहिराने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
View this post on Instagram
या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “आयुष्यात जे जे काही वाट्याला येतं त्यातून काहीतरी चांगलंच करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यातून तुम्हालाही आनंद मिळणार असतो आणि यापुढेही तुम्ही चांगलंच कराल ही तुम्हाला खात्री असते. जागतिक आरोग्य दिन असो वा नसो स्वत:ची शक्य तितकी काळजी घ्या. नियमित तपासणी करा. मॅमोग्रामला घाबरू नका. पुन्हा एकदा कॅन्सरला सामोरं जाण्यासाठी मी सज्ज आहे. चला.”
ताहिराला २०१८ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने उपचार घेऊन यावर मात केली. नंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि ती तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलताना दिसली. तिने स्तनांच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान शरीरावर झालेल्या खुणा दाखवल्या होत्या. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने उपचारादरम्यान केस गेले तेव्हाचे टक्कल असलेले फोटो पोस्ट केले होते.