Monday, May 19, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Samudra Pradakshina : भारतीय महिलांची समुद्र प्रदक्षिणा

Samudra Pradakshina : भारतीय महिलांची समुद्र प्रदक्षिणा
मुंबई : भारताच्या भूदल, नौदल आणि हवाई दलामधून निवड झालेल्या १२ महिला समुद्र प्रदक्षिणेला निघाल्या आहेत. या भारतीय महिलांच्या पथकाला समुद्र प्रदक्षिणेसाठी नौदल वॉटरमॅनशिप प्रशिक्षण केंद्र, कुलाबा, मुंबई येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीएमई) कमांडंट लेफ्टनंट जनरल ए.के. रमेश यांनी हिरवा झेंडा दाखवला. समुद्र प्रदक्षिणेला निघालेले भारतीय महिलांचे पथक मुंबई ते सेशेल्स आणि सेशेल्स ते मुंबई असा प्रवास करणार आहे. या प्रदक्षिणेच्या अनुभवाआधारे तयारी करुन २०२६ मध्ये भारतीय महिलांचे पथक आणखी एका धाडसी सागरी मोहिमेवर निघणार आहे.



भारताच्या बारा महिलांची समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम सोमवार ७ एप्रिल २०२५ रोजी सुरू झाली. ही मोहीम ५५ दिवसांत पूर्ण केली जाईल. आयएएसव्ही त्रिवेणीवरून चार हजार सागरी मैलांचा प्रवास करुन महिलांचे पथक समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम यशस्वी करणार आहे. समुद्र प्रदक्षिणा या मोहिमेत महिलांचे पथक लहरी हवामान, अस्थिर समुद्र, बदलते वातावरण, प्रतिकूल परिस्थिती, यांत्रिक आणि शारीरिक आव्हाने अशा अनेक समस्यांना सामोरे जाणार आहे. या आव्हानांना लीलया पेलण्यासाठी खोल समुद्रात लवचिकता, बुद्धिमत्ता, संयम, धाडस, धैर्य आणि दृढनिश्चय यांचा कस लागणार आहे.

समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. तसेच राणी वेळू नाचियार, राणी दुर्गावती आणि राणी लक्ष्मीबाई सारख्या भारतातील महान योद्धा राण्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे.

महिलांच्या समुद्र प्रदक्षिणा या ऐतिहासिक प्रवासाचा समारोप ३० मे २०२५ रोजी मुंबईत ध्वजारोहण समारंभाने होईल. नारी शक्ती ही कोणत्याही आव्हानावर मात करण्यास सक्षम असलेली एक अटळ शक्ती आहे यावर समुद्र प्रदक्षिणा मोहिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होणार आहे.
Comments
Add Comment