Tuesday, May 20, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले आपत्कालीन लँडिंग

इंडिगोच्या विमानात महिलेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले आपत्कालीन लँडिंग

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान मृत्यू होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. रविवारी रात्री अशाच एका दुर्दैवी घटनेत इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-वाराणसी विमानात प्रवास करणाऱ्या ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथील चिखलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.



सदरील महिला ही उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर येथील रहिवासी असून सुशीला देवी यांनी मुंबईहून आपला प्रवास सुरू केला होता. मात्र उड्डाणादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने ही माहिती क्रू मेंबर्सनी तात्काळ वैमानिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सुरक्षा व आरोग्याच्या काळजीने विमानाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


लँडिंगनंतर विमानतळावरील वैद्यकीय पथकाने सुशीला देवी यांची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानात त्या वेळी डॉक्टर उपस्थित होते की नाही, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments
Add Comment