मुंबई : आयपीएल २०२५ चा २० वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. एकीकडे रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स,यंदाच्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून तर दुसरीकडे आयपीलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या ताफ्यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने येणार आहेत.जसप्रीत बुमराहच्या संभाव्य पुनरागमनामुळे मुंबईसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.
खेळपट्टीचा अहवाल
वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी ही लाल मातीची आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे मोठ्या धावसंख्या झाल्या आहेत आणि विशेषतः दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांना चांगला फायदा होतो. आतापर्यंत येथे झालेल्या ११७ आयपीएल सामन्यांपैकी ६३ वेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.
गोलंदाजीच्या दृष्टीने बोलायचे झाले तर, येथे वेगवान गोलंदाजांना फिरकी गोलंदाजांपेक्षा थोडा अधिक लाभ होतो. हरभजन सिंगने येथे सीएसके विरुद्ध ५/१८ अशी सर्वोत्तम स्पेल नोंदवली आहे, मात्र एकूण खेळपट्टी ही फलंदाजांसाठी अनुकूलच राहिली आहे. त्यामुळे २००+ धावसंख्या प्रथम फलंदाजी करणाऱ्यांसाठी आवश्यक मानली जात आहे.
वानखेडेवरील काही महत्त्वाचे विक्रम
-सर्वोच्च सांघिक धावसंख्या: २३५ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्स विरुद्ध केली)
-सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: नाबाद १३३ (एबी डिव्हिलियर्स – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
-सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल: ५/१८ (हरभजन सिंग – मुंबई इंडियन्स)
वानखेडेवरील हवामानाचा अंदाज
सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान खेळासाठी पूर्णपणे अनुकूल राहणार आहे. तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस असेल, आकाश स्वच्छ राहील आणि वारे साधारणतः १६ किमी/ताशी वेगाने वाहतील. त्यामुळे पावसाचा कोणताही अडथळा राहणार नाही.सामन्याची महत्त्वाची पार्श्वभूमीआजच्या सामन्यात वानखेडेच्या खेळपट्टीचा विचार करता, फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली तर मोठी धावसंख्या उभारता येईल. परंतु लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्यांना येथे अधिक फायदा होत असल्याने नाणेफेक निर्णायक ठरू शकते.