वॉशिग्टन : वाढीव आयात शुल्क लागू करत जगभरातील देशांना वेठीस धरणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभाराविरुद्ध अमेरिकन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर त्यांचे सल्लागार जगातील उद्योजक एलाॅन मस्क यांच्या धोरणांवरही जनमत भडकू लागले आहे. या दोघांच्या निषेधार्थ शनिवारी ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. ट्रम्प आणि मस्क यांच्यापासून अमेरिकेतील लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप यावेळी निदर्शकांनी केला.
US Tariffs : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला शेअर बाजाराचा प्रतिकूल प्रतिसाद, जगभर मार्केट कोसळले
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या काही मोठ्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा असेल, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) असेल किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय असेल अशा या निर्णयांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसला आहे. या धोरणांच्या विरोधात अमेरिकन नागरिक ‘हॅन्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले.
सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली, गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे. या आंदोलनामध्ये नागरी हक्क संघटना, कामगार संघटना, वकील संघटनासह यूएसमधील १५० हून अधिक संघटना आणि हजारो अमेरिकन निदर्शकांनी वॉशिंग्टन, न्यू यॉर्क, ह्युस्टन, फ्लोरिडा, कोलोरॅडो आणि लॉस एंजेलिससह तब्बल १२०० ठिकाणी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध केला. यावेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या धोरणांचा विरोध करत निदर्शकांनी आर्थिक धोरणांबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच काही निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलतील, असेही म्हटले आहे.
दरम्यान, निदर्शनांवर व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सुविधा देण्याच्या बाजूने ते नेहमी आहेत. डेमोक्रॅट्सचा दृष्टिकोन बेकायदेशीर परदेशी नागरिकांना सामाजिक सुरक्षा, मेडिकेड आणि मेडिकेअर फायदे देण्याचा आहे. यामुळे हे कार्यक्रम दिवाळखोरीत निघतील आणि अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.”