Tuesday, April 8, 2025
Homeताज्या घडामोडीयंदा झाडांची पद्धतशीर छाटणी होणार

यंदा झाडांची पद्धतशीर छाटणी होणार

कामगारांना वृक्षछाटणीचे धडे; उद्यान खाते सुसज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे या घटना घडून नयेत यासाठी झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्याने कंबर कसली आहे. यासाठी महानगरपालिकेने परिमंडळ स्तरावर कामगारांना वृक्षछाटणीसंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सहा परिमंडळातील कामगार, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून पुढील आठवड्यात परिमंडळ १ मधील कामगारांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन पालिकेच्या उद्यान खात्याने केले आहे.

महानगरपालिकेच्या उद्यान खात्यातर्फे वर्षभर वृक्षछाटणी केली जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी या कामावर अधिक भर दिला जातो. दरवर्षी पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे आदी घटना घडतात. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून जखमींचीही संख्या मोठी आहे. तसेच, या घटनांमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी केल्यास या घटनांना आळा बसू शकतो. मात्र, वृक्ष छाटणी करणाऱ्या कामगारांना याबाबत माहिती नसल्याने अनेकदा अशास्त्रीय पद्धतीने झाडांची छाटणी केली जाते. याबाबत अनेकदा नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत, नागरिकांच्या सूचनेनुसार, महापालिकेने गेल्या वर्षापासून कामगारांना वृक्ष छाटणीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

यंदाही पालिकेच्या परिमंडळ स्तरावर कामगारांना वृक्ष छाटणीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी न झाल्यामुळे झाडांचे सौंदर्य नष्ट होते, त्यांची वाढ खुंटते, तसेच झाडाचा समतोल बिघडून ते कोसळण्याची शक्यता निर्माण होते. अनेकदा घरे, विजेच्या तारा, रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांवर झाडाच्या फांद्या कोसळतात. महापालिकेतर्फे ही समस्या टाळण्यासाठी कामगारांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. उप उद्यान अधीक्षक सचिन वारिसे, मुंडे आणि सचिन अतर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात वृक्षतब्ज्ञ विवेक राणे व रॉबर्ट फर्नाडिस यांनी वृक्ष छाटणीच्या शास्त्रोक्त तंत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षणात महापालिकेच्या पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यानविद्या सहाय्यक, कनिष्ठ वृक्ष अधिकारी व वृक्ष छाटणीचे काम करणारे कामगार मिळून १५० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करणे, त्यासंदर्भातील योग्य पद्धती, जोखमीचे मूल्यमापन करून अनावश्यक वृक्षतोड टाळणे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी कर्मचाऱ्यांना श्री कट पद्धत, कॅनोपी कपात याबाबत प्रात्यक्षिकेही दाखविले होते.

झाडांच्या शास्त्रोक्त छाटणीचे फायदे

१) झाडाची योग्य रचना तयार होते. २) सूर्यप्रकाश आतपर्यंत पोहोचतो. ३) हवा खेळती राहते, रोग-किडीचे प्रमाण कमी होते. ४) जुन्या, वाळलेल्या, रोगट फांद्या काढता येतात. ५) नवीन, निरोगी फांद्यांना जागा मिळते. ६) फळधारणा वाढते आणि फळांची गुणवत्ता सुधारते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -