Wednesday, August 13, 2025

US Tariffs : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला शेअर बाजाराचा प्रतिकूल प्रतिसाद, जगभर मार्केट कोसळले

US Tariffs : अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला शेअर बाजाराचा प्रतिकूल प्रतिसाद, जगभर मार्केट कोसळले
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतासह जागातील अनेक देशांमधून आयात केल्या जाणाऱ्या मालावर टॅरिफ लागू केला आहे. या निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसत आहे. नव्या आठवड्याची सुरुवात शेअर बाजार कोसळून झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३० पैशांनी घसरून ८५.७४ वर पोहोचला. तसेच सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३,९३९.६८ अंकांनी घसरून ७१,४२५.०१ वर पोहोचला; निफ्टी १,१६०.८ अंकांनी घसरून २१,७४३.६५ वर पोहोचला.

टॅरिफबाबत अमेरिकेने घेतलेल्या निर्णयांनंतर अनेक देशांच्या शेअर बाजारांमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया मागितली असता, टॅम्प यांनी चकीत करणारी प्रतिक्रिया दिली. मला काहीही बिघडू द्यायचे नाही. पण काही वेळा आजारावर उपचार करण्यासाठी दिलेल्या औषधांचा सुरुवातीला प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते; असे ट्रम्प म्हणाले.

जगभर फार्मा, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारात ६ टक्क्यांहून अधिक घसरण दिसून येत आहे, तर दक्षिण कोरियाच्या बाजारात ५ टक्क्यांनी आणि जपानच्या बाजारात १० टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली आहे. चीनचा बाजार १० टक्क्यांनी घसरला आहे, तर हाँगकाँगचा बाजार १० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. बाजारात आणखी १५ ते २० टक्क्यांच्या घसरणीची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढेल. अमेरिकेसह जगभर मंदीची लाट येईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या या भीतीचाही शेअर बाजारावर परिणाम झाला आहे.



अमेरिकेने भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर २६ टक्के टॅरिफ जाहीर केला आहे. हे करताना अमेरिकेतील कारखान्यात तयार होणाऱ्या पक्क्या मालासाठी आवश्यक कच्चा माल म्हणून येणाऱ्या अनेक भारतीय वस्तू तसेच अमेरिकेसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारतीय वस्तू यांना टॅरिफमधून सवलत देण्यात आली आहे. आता अमेरिका भारताला द्यायच्या सवलतीत आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. या मुद्यावर भारत आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळांची चर्चा सुरू आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार भारत, इस्रायल आणि व्हिएतनाम या तीन देशांच्या प्रतिनिधी मंडळांशी अमेरिका चर्चा करत आहे.



भारत – अमेरिका यांच्यातील आयात – निर्यात व्यापारात दोन्ही देशांच्या लाभांचा विचार करुन तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. द्विपक्षीय व्यापार कराराची बोलणी यशस्वी झाल्यास भारताला टॅरिफमधून मिळत असलेल्या सवलतीत आणखी वाढ होणार आहे. अमेरिकेने सध्या चीन आणि कॅनडा या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार कराराबाबत नव्याने चर्चेचा विचार करत नसल्याचे जाहीर केले आहे.



अमेरिकेने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ते ९ एप्रिल पासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर २६ टक्के टॅरिफ, व्हिएतनामच्या वस्तूंवर ४६ टक्के आणि इस्रायलच्या वस्तूंवर १६ टक्के टॅरिफ लावणार आहेत. भारतावर २६ टक्के टॅरिफ लागू करणाऱ्या अमेरिकेने चीनवर ३४ टक्के टॅरिफ नव्याने लागू केला आहे. आधीपासूनच चिनी मालावर २० टक्के टॅरिफ आहे. यामुळे ९ एप्रिल पासून अमेरिकेत जाणाऱ्या चिनी मालावर ५४ टक्के टॅरिफ असेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा