भाईंदर : मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या बसला मागील बाजूला काचे ऐवजी प्लायवुड लावले असल्याने संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला आहे त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन सुद्धा होत आहे. मीरा भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून प्रवाशांच्या सेवेसाठी ७४ बसचा ताफा तसेच ३२ इलेक्ट्रिक बस सुध्दा असून त्या सर्व १८ बस मार्गावर धावतात त्यातून दररोज १ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. अशी उत्कृष्ट सेवा ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील महापालिकेत कौतुकास्पद म्हणून ओळखली जात आहे. परंतु अलीकडे वाहनांत वारंवार तांत्रिक बिघाड अधिक आढळून येत आहे.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांना शनिवार ५ एप्रिल रोजी बस क्र. एम.एच.०४ इ.पी. ०६४० तसेच बस मार्ग क्र. २४ या बस मधून प्रवास करताना आढळून आले की, बसची मागील काच पूर्णपणे तुटल्यामुळे त्या जागेवर काच न लावता प्लायवूड लावून ती जागा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ती काच बस चालकाला मागून येणाऱ्या वाहनाचे संकेत समोरील व दोन्ही बाजूला असलेल्या आरश्यात दिसत असतात. तसेच ती काच म्हणजे संकट परिस्थितीत सुखरुपपणे बाहेर पडण्याचा मार्ग असतो. तसा संदेश त्या काचेवर सुद्धा लिहिलेला असतो. तीच जागा प्लायवुड लाऊन बंद केल्यामुळे प्रवाशांचा संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत सचिन जांभळे यांनी महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना तक्रारीचे निवेदन दिले आहे.