मुंबई: वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात चांगलाच रंगतदार सामना झाला. मुंबईच्या शेवटच्या बॉलपर्यंत जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मुंबईला जिंकण्यासाठी २२२ धावा हव्या होत्या. मात्र त्यांना २० षटकांत २०९ धावाच करता आल्या.
मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने जबरदस्त खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. तिलक वर्माने २९ बॉलमध्ये ५६ धावा ठोकल्या. तर हार्दिक पांड्याने १५ बॉलमध्ये ४२ धावांची खेळी केली.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट गमावत २२१ धावा केल्या. कोहली आणि रजत पाटीदारने शानदार अर्धशतक ठोकले.
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आरसीबाला पहिल्याच षटकात धक्का बसला. फिल सॉल्ट दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. मात्र यानंतर आरसीबीचा संघ सावरला. विराट कोहलीने जबरदस्त खेळी केली. देवदत्त पड्डिकलही लयीमध्ये दिसला. पड्डिकल ९व्या षटकांत ३७ धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. मात्र १५व्या षटकांत हार्दिक पांड्याने कोहली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी दोघांना बाद केले. विराट कोहलीने ४२ बॉलमध्ये ६७ धावा केल्या. मात्र यानंतर रजत पाटीदारने कमालीची फलंदाजी केली. पाटीदारने ३२ बॉलमध्ये ६४ धावा केल्या. याच्या जोरावर आरसीबीने ५ विकेट गमावत मुंबईसमोर २२२ धावांचे आव्हान दिले होते.