Saturday, September 13, 2025

पिल्लांच्या मायेपोटी कुत्रीचा बिबट्याशी लढा!

पिल्लांच्या मायेपोटी कुत्रीचा बिबट्याशी लढा!

बिबट्याशी लढणा-या 'शक्ती'चा तो थरारक सामना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला

मुंबई : आईच्या प्रेमाला मर्यादा नसते, हे पुन्हा सिद्ध केलंय मुंबईतील आरे कॉलनीतील एका धाडसी कुत्रीने. 'शक्ती' असं तिचं नाव. एका रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेत, बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. पण तिच्या दहा पिल्लांना दूध पाजण्यासाठी आणि त्यांच्याकडे परतण्यासाठी तिने बिबट्याशी थेट झुंज दिली!

ही धक्कादायक घटना आहे गोरेगावमधील आरे कॉलनीतील. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की, बिबट्या शक्तीला जबड्यात घेऊन पळून जातो. पण काही क्षणांतच शक्ती धाडसाने त्याच्या तावडीतून सुटते आणि परत आपल्या पिल्लांकडे येते.

हल्ल्यात तिच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या असून देखील, शक्तीने हार मानली नाही. आपल्या पिल्लांसाठी ती पुन्हा घरी आली. या असामान्य धैर्यामुळे तिचं नाव ‘शक्ती’ ठेवलं गेलंय.

सध्या ती अंधेरीतील वर्ल्ड फॉर ऑल या प्राणीमित्र संघटनेच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. तिची पिल्लं आरे कॉलनीतील स्थानिक आदिवासी काळजीपूर्वक सांभाळत आहेत.

वर्ल्ड फॉर ऑल संस्थेने तिची कहाणी इंस्टाग्रामवर शेअर केली, आणि अवघ्या सोशल मीडियावर शक्तीच्या धाडसाची चर्चा सुरु झाली. संस्थेने सांगितलं, “शक्तीला आधी काही ठिकाणी वैद्यकीय मदत नाकारण्यात आली होती. पण शेवटी आमच्याकडे पोहोचवण्यात आली आणि तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.”

आईच्या मायेचा हा झणझणीत प्रत्यय देणारा प्रकार सध्या समाज माध्यमांवर भावूक कौतुकाचा विषय ठरला आहे.

Comments
Add Comment