सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
माणगांव (प्रमोद जाधव) : रायगडमधील माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचाराविनाच जबरदस्तीने घरी पाठविलेल्या एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घुम गावा मधली ही घटना आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा उपचारा अभावी मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्याच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना माणगाव तर्फे करण्यात आली आहे.
गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णात उपचार साठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला ताप आल्याने दि. ५ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे १०८ रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी आणण्यात आले. त्यावेळेस त्याच्यावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर माणगाव तालुक्यातील शिवसेना आक्रमक झाली असून त्यांनी उपजिल्हा रुग्णालय माणगावला भेट दिली. याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व गर्वांगच्या आई-वडिलांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी शिवसेना तर्फे करण्यात आली.
गर्वांगच्या मृत्युने घूम गावामध्ये शोककळा पसरली आहे. गर्वांग याच्या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप देखील या प्रकरणात त्याच्या कुटुंबीयांनी केले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच तपासले असता तर ऍडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही असे तपासणारे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर वरिष्ठ याबाबत योग्य ती कारवाई करतील, असे मत डॉ. किरण शिंदे, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड, अलिबाग यांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टर सावंत व डॉक्टर राप्ते यांनी सदरील रुग्ण तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठवले. वरिष्ठांकडून या संदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला व त्याच्या आई-वडिलांना १०० टक्के न्याय मिळेल, असे डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगांव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सदर प्रकार आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा असून केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व कर्तव्य शून्य कारभारामुळे १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी असे मत युवासेना (शिंदे गट) रायगड जिल्हाप्रमुख विपूल उभारे यांनी व्यक्त केले आहे.