क्राइम – अॅड. रिया करंजकर
एक काळ असा होता की, लोकांना घरातून ओढून घेऊन नोकरीला लावलं जात होतं. नोकऱ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या; परंतु त्यासाठी कामगार मुंबई शहरांमध्ये उपलब्ध नव्हता. एकाच वेळी चार-चार ठिकाणांवरून नोकरीसाठी बोलवण्यात येत होतं. असा तो काळ होता. मुंबई महापालिकेमध्ये अनेक कामगारांची भरणा त्यावेळी करण्यात आली होती आणि कामगार राहणार कुठे म्हणून त्यांच्यासाठी वसाहती निर्माण करण्यात आले की, जेणेकरून महापालिकेमध्ये कामगार काम करेल. अशा वसाहतींमधल्या घरांमध्ये एकाच कुटुंबामध्ये अनेकजण राहत होती. महापालिकेत काम करणारा एक होता पण त्याचं अख्ख कुटुंब त्या घरामध्ये राहत होतं. वडिलांच्या नंतर मुलाला महापालिकेची नोकरी मिळत होती. हे अनेक वर्षे असंच चालू होतं. त्याच्यामुळे ती खोली कायमची त्याच कामगारांकडे असायची.
वसंत हा एक महानगरपालिकेमध्ये काम करणारा कामगार होता. त्यालाही त्याच्या वडिलांकडून ही नोकरी मिळाली होती. त्यामुळे ज्या वसाहतीमध्ये तो राहत होता ती खोली आता त्याच्या नावे झाली होती. वसंत यांनी दोन लग्न केली होती. एक बायको ही वेगळ्या ठिकाणी राहत होती आणि दुसरी बायको ही या महापालिकेच्या वसाहतीमध्ये राहत होती. पहिल्या बायकोकडे वसंत येऊन जाऊन असायचा. वसाहतीच्या खोलीमध्ये त्याची दुसरी बायको आणि भाऊ सुदर्शन, त्याचे कुटुंब राहत होते. वसंतचा भाऊ म्हणायचा की, वडिलांची नोकरी तुला मिळाली तर ही खोली माझी आहे. असे त्या भावांमध्ये वाद सुरू झाले. वसंतही त्या गोष्टींकडे कानाडोळा करत होता. जसं वय वाढत गेलं तसं वसंतचे आजारपण वाढत गेले आणि एक दिवस अटॅक येऊन वसंतचा मृत्यू झाला. वसंत निघून गेल्यावर कायदेशीर प्रक्रिया करताना पहिली पत्नी सुधा ही त्याची कायदेशीर पत्नी होती, तर दुसरी बायको वासंती ही कायदेशीर पत्नी नव्हती. वसंतने आपल्या कामातील कागदपत्रांवर सुधाचे नाव लिहिले होते. सुधाला दोन मुलं होती. वासंतीला काहीच मूलबाळ नव्हतं. ती सुदर्शनसोबत राहत होती. वसंतचे पीएफ व ग्रॅज्युएटी मिळण्याची वेळ आली तेव्हा. सुधाने वासंतीला सांगितलं की मी तुझ्यावर अन्याय करणार नाही तुलाही त्याच्यातला थोडा भाग देईन. ज्यावेळी सुधा महापालिकेच्या ऑफिसमध्ये गेली. त्यावेळी तिला तिथून सांगण्यात आले की जोपर्यंत तुम्ही महापालिकेचे वसाहतीमधले घर पालिकेच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत तुम्हाला वसंतची ग्रॅज्युएटी मिळणार नाही एवढेच नाही, तर तुम्हाला पेन्शनही सुरू होणार नाही. म्हणून तिने आपल्या दिराला सुदर्शनला ती रूम खाली करण्यास सांगितले. वसंतच्या नावावर ती रूम असल्यामुळे सुदर्शन ती रूम खाली करायला तयार नव्हता.
वसंतला वडिलांची नोकरी मिळाली मला ही खोली पाहिजे असे तो महापालिकेला म्हणत होता. पण जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत खोली असते हे त्याला समजत नव्हतं. सुधाने अनेक फेऱ्या महापालिकेत घातल्या. तिला तेच उत्तर मिळत होतं. शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्याने तिला सांगितलं की, जोपर्यंत सुदर्शन खोली खाली करत नाही तोपर्यंत तुमची ग्रॅज्युएटीमधून आम्ही त्या घराचं भाडं वजा करत जाणार आहोत. ही गोष्ट सुधाने सुदर्शनला सांगितली. तरीही तो ऐकायला तयार नव्हता. महापालिकेने खोली खाली करण्याची जबाबदारी सुधाच्या नावावर टाकली होती. सुधा आणि दोन मुलांचं कसं होणार हा प्रश्न तिच्या समोर होता. शेवटी अनेक प्रयत्न करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिला पेन्शन सुरू करून देतो असे सांगितले पण वसंतची थकीत रक्कम ही आम्ही रूम खाली करत नाही तोपर्यंत देणार नाही असे सांगितले.
महानगरपालिकेने सुधाला कायदेशीररीत्या कोर्टात जाऊन तुम्ही ती खोली खाली करून द्या असे सांगितले. उद्या थकबाकीतले पैसे भाडे म्हणून संपले, तर ती खोली तुमच्या नवऱ्याच्या नावावर होती म्हणून महापालिका तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल असे सुधाला सांगितले. पण हे सुदर्शनला कळत नव्हतं की ज्याच्या नावावर ती खोली आहे तो मरण पावलेला आहे. त्याच्यामुळे पुढील भविष्यामध्ये मृत पावलेल्या नावाने खोली मिळणं शक्य नव्हतं जरी सुदर्शन वसंताच्या दुसऱ्या बायकोचा सांभाळ करत असला तरी ही खोली त्याला मिळणार नव्हती. कारण वसंतनंतर त्याच्या पुढची पिढी महापालिकेमध्ये कामावर घेतली नव्हती. कायद्यात बदल झाल्यामुळे वारस त्याच्या जागेवर कामाला लागणं बंद करण्यात आलं होतं. वसंताने आयुष्यभर काम केले. आपल्या खोलीत भावाला आधार दिला पण काम केलेल्या रकमेतून त्याची पत्नी आणि मुलांना एकही रुपया मिळणार नव्हता. कारण त्याचा भाऊ ती खोली सोडायला तयार नव्हता. त्यामुळे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आजपर्यंत राहिलेली थकबाकी ही सुधाला मिळाली नाही म्हणून सुधाने न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा विचार केला. उद्या नको त्या अडचणीत पडण्यापेक्षा आताच कायदेशीर कारवाई केली, तर योग्य ठरेल. या वकिलांच्या सल्ल्याने ती आता न्यायालयीन लढा लढत आहे.
(सत्यघटनेवर आधारित)