प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
खरं तर आपण जग पाहण्यासाठी जातो तेव्हा परदेशातील माणसांबरोबर आपल्या भारतीयांनाही अनुभव येतच असतो. प्रत्येक प्रवासामध्ये चांगली-वाईट माणसे भेटत जातात. आपल्याला काहीतरी शिकवत जातात. एका प्रवासादरम्यान आमचा एक सोबती होता साधारण पाच फूट उंचीचा असावा. काळा सावळा, कडक इस्त्रीचे कपडे घालून वर जॅकेट घालून फिरणारा. सोबतीच्या सर्व पुरुष माणसात उंचीमुळे असेल किंवा वागणुकीमुळे थोडासा वेगळा भासणारा.
पहिल्याच दिवशी जेवणाच्या टेबलावर आमच्या ताटाकडे पाहून त्याने विचारले, “हे तुम्ही कसे काही खात आहात?” आम्ही त्याला उत्तर दिले, “ही कढीतली भजी आहेत.” तो म्हणाला, “म्हणजे नक्की शाकाहारीच आहे ना?” आम्ही हसून उतरलो, “हो शंभर टक्के…” तो म्हणाला, “नाही त्या आकारावरून मला असे वाटले की…” आणि हसत हसत तिथून निघून गेला. खरंतर तिथे ठेवलेले प्रत्येक पदार्थ शाकाहारी आहेत की मांसाहारी आहेत हे कळण्यासाठी व्यवस्थित हिरवे आणि लाल गोल आकाराचे चिन्ह करून त्याच्यापुढे त्या त्या पदार्थाचे नाव इंग्रजीमध्ये लिहिलेले होते. असो.
साधारण बारा ते चौदा तासांचा प्रवास करून विमानतळावर उतरलो होतो. इतके जास्त दमून आल्यावर प्रत्येकाला विश्रांतीची आवश्यकता जाणवत होती अशा वेळेस साधारण दोन तास आम्ही विमानतळावरच होतो याचे कारण म्हणजे हाच माणूस! सगळेजण बाहेर आले तरी हा माणूस सापडत नव्हता. गंमत म्हणजे त्याची बायको आमच्यासोबत होती. परदेशात जाताना त्याने तिकडचे कार्ड न घेतल्यामुळे त्याचा मोबाईल बंद होता अशा वेळेस त्याला संपर्क करणे, त्याला शोधणे कठीण होते. शेवटी आमचा पर्यटन मार्गदर्शक पंधरा डिग्री तापमानातसुद्धा घामेजोखिल झाला होता. त्या विमानतळावर एका वेळेस चाळीस माणसे बसण्याएवढी जागाही नव्हती. विमानातून उतरल्यावर सर्वांनी सोबत राहण्याचा आणि हातात असलेल्या झेंड्याकडे पाहात प्रवास करण्याचा सल्ला मार्गदर्शकाने आम्हा सर्वांना दिला होता. मार्गदर्शकाकडे केवळ त्याचा फोटो असल्यामुळे तो त्याचा शोध घेऊ शकला बाकी एकमेकांची तशी अजूनही ओळख झालेली नव्हती. तो जेव्हा समोर आला तेव्हा सगळेच त्याच्यावर चिडलेले होते तरी त्यातल्या एका माणसाने त्याला सहज विचारले, “तुम्ही कसे काय हरवलात?”
त्याने उत्तर दिले, “या प्रचंड मोठ्या विमानतळात मला बाहेर जायचा मार्ग सापडत नव्हता आणि इथे या देशात कोणालाच माझी भाषा कळत नव्हती.” दुसऱ्या दिवशी मार्गदर्शकाने आम्हाला सांगितले की हा माणूस ‘स्मोकिंग झोन’ पाहून त्याच्या आत शिरला आणि आपल्या संपूर्ण ग्रुपपासून वेगळा झाला. आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचे आहे याचे विस्मरण सिगारेट ओढणाऱ्या या माणसाला थोडे तरी हवे होते. या माणसामुळे आमचे तब्बल दोन तास वाया गेले होते!
एके दिवशी एका पर्यटन स्थळी एकच स्वच्छतागृह होते आणि तिथे देशविदेशातील महिलांबरोबर आमच्या सहलीतल्या काही महिला रांगेत शांतपणे उभ्या होत्या. तिथे हा माणूस आपल्या पत्नीला घेऊन आला. पत्नी व्यवस्थित रांगेत उभी राहिली, तर तो तिला म्हणाला, “असं बाजूने पुढे जा. किती वेळ थांबशील या रांगेत…?” खरंतर ती पुढे गेली असती तर तिथे आमच्यासहित विदेशातील महिलासुद्धा काहीच बोलल्या नसत्या; परंतु मला मात्र राग आला. मी म्हटले, “सर सगळेजण स्वच्छतागृह वापरण्यासाठी इथे रांगेत उभे आहेत त्यामुळे त्या रांगेतून पुढे आल्या तर बरं होईल आणि त्यांना घेतल्याशिवाय आपली बस काही इथून हलणार नाही. आम्ही आहोतच ना सोबत.”
तो कसेनुसे हसून तिथून निघून गेला. बाजूलाच स्वच्छतागृहाबाहेर पुरुषांची रांग मला दिसत होती. तिथे नजर टाकली, तर हा दिसला नाही आणि दोन-तीन मिनिटानंतर मला तो चक्क स्वच्छतागृह बाहेर येताना दिसला याचा अर्थ नक्कीच मध्येच घुसला असणार! साधारण वीस ते बावीस जेवणाच्या वेळेस मी या माणसाला पत्नीसहित जेवणाच्या रांगेत घुसताना व्यवस्थित पाहिले होते.
आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासात होतो तेव्हा विमानतळावर सर्वजण रांगेत उभे होतो. रांग तशी मोठी होती आणि हळूहळू सरकत होती. हा माणूस आपल्या पत्नीसह माझ्या मागे होता. अचानक पाहिले तर हा रांगेसाठी बांधलेल्या काही दोऱ्यांना पार करत बिझनेस क्लास काऊंटरवर पोहोचला होता. तिथे जाऊन काय बोलले माहीत नाही; परंतु तिथे पोहोचल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला ही अशाच दोऱ्यांच्यामधून बिझनेस क्लासपर्यंत बोलवले आणि पाच मिनिटांमध्ये दोघेजण तिकीटे घेऊन बाहेर पडले. शेवटी या सहलीतल्या प्रत्येकालाच एकाच विमानात चढायचे होते आणि एकाच वेळेस परतायचे होते अशा तऱ्हेने पुढे जाऊन त्याने काय साधले माहीत नाही.
खरंतर यांच्या खूप साऱ्या गमती आहेत; परंतु शेवटची गंमत सांगते. आम्ही विमानात चढलो. शांतपणे बसलो. आठ तासांचा प्रवास करायचा होता. अचानक हा माणूस समोरून येताना दिसला. विमानात चढल्यावर त्याला सपत्नीक माझ्या दोन सीट मागे बसलेले व्यवस्थित पाहिले होते. समोरून हा कसा काय आला, असा मनात विचार आला. त्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा वेळा या माणसाला या संपूर्ण विमानात फेऱ्या मारताना पाहिले. हे काय कमी म्हणून त्याची पत्नीसुद्धा कदाचित त्याच्या सांगण्यावरून विमानात फेऱ्या मारत होती. एखाद्या बागेत फिरतात तसे ते फिरत होते. विमानातून चालताना आपल्याला आजूबाजूच्या सीटला धरत धरत पुढे जावे लागते अशा वेळेस काही झोपलेल्या माणसांना धक्का लागून ते उठत होते. काहींचे पाय बाहेर आलेले होते त्यांना धक्का लागत होता याचे भान या दोघांना नव्हते. त्यांना या विमानात चालण्याचा व्यायाम करायचा होता की आणखी काही दाखवून द्यायचे होते कोणास ठाऊक?
खूपदा समोरची माणसे चुकीचे वागतात हे पाहूनसुद्धा इतर माणसे काहीच बोलत नाहीत याचाही हे फायदा घेतात. त्यांना जे वाटते ते ते करत राहतात. वयस्कर माणसांना बोलता येत नाही परंतु विक्षिप्त माणसांचे करायचे काय? याचा दोष त्यांना द्यायचा की आपण घ्यायचा?
pratibha.saraph@ gmail.com