‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घालवली या गावी झाला. विंदा हे कोकणातील पोम्भुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते.
विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे महत्त्वाचे साहित्यप्रकार लीलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. मा. विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी गं परी, सर्कसवाला’ यांसारखे बालकवितासंग्रह दिले. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’पासून मा. विंदांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला. विंदांचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठी भाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्त्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले.
विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी गं परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नावीन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ. वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. मा. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणाऱ्या विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणाऱ्याने देत जावे’चा अनुभव रसिकांना दिला.
काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही काव्यवाचनाच्या जाहीर कार्यक्रमांचे अनेक फड रंगवले आहेत. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या ‘स्वेदगंगा’पासून सुरू झालेला विंदांचा साहित्यिक प्रवास ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आदी काव्यसंग्रह; ‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ हे दोन लघुनिबंधसंग्रह; ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवा’चा अर्वाचीनीकरणाचा अभिनव प्रयोग; ‘परंपरा आणि नवता’ हा मराठी समीक्षालेख संग्रह; फाऊस्ट, राजा लिअर आणि ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र आदी अनुवादीत ग्रंथ.‘राणीचा बाग’, ‘अष्टदर्शने’ या संग्रहापर्यंत येऊन पोहोचतो. ‘अष्टदर्शने’ या संग्रहात आठ तत्त्वज्ञांचे विचार त्यांनी सोप्या रचनांमध्ये मांडले आहेत. याच संग्रहाकरिता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आशयगर्भित पण सोपी शब्दरचना करणारे विंदा आपल्या कवितांतून वैश्विक सत्य धुंडाळत राहिले. त्यांची कविता प्रयोगशील आहे. विंदांच्या काव्यात व्यक्तिगत भावजीवनापासून सामाजिक वास्तवापर्यंतचे व्यापक अनुभव पाहायला मिळतात. विंदांना ललित पारितोषिक समितीचे क्रिटिक्स अॅवॉर्ड, सीनियर फुलब्राईट, कबीर सन्मान, सोव्हिएत लँड नेहरू लिटररी अॅवॉर्ड, जनस्थान पुरस्कार तसेच साहित्य अकादमीची फेलोशिपही मिळाली आहे.
१९४९ च्या मे महिन्यात विंदांच्या ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहात अंतर्भूत कवितांची सामाजिक आशयाची कविता, व्यक्तिचित्रणात्मक, प्रेमविषयक, बालजीवनविषयक, चिंतनात्मक, देवगड-राजापूरकडील बोलीभाषेतील कविता अशी वर्गवारी करता येऊ शकते. स्वेदगंगा कवितासंग्रहातून पुढील तीन कविता घेण्यात आल्या आहेत. विंदांच्या एकूण कवितेबद्दल बोलायचं तर ती बहुरूपिणी आहे.
तिच्यात ‘माझ्या मना बन दगड’ किंवा ‘जिचा आत्मा एक ती जनता अमर आहे’ असं सांगण्याचं सामर्थ्य आहे. ‘परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय’ किंवा ‘माझे मला आठवले तुझे तुला आठवले, नकळत हातामध्ये हात गेले गाठवले, सावरला पुन्हा तोल जरी कळे दोघांनाही जुने पाणी किती खोल’सारखी सुकोमलता आहे. ‘उपजत होती तुला कला ती’ किंवा ‘सारे तिचेच होते सारे तिच्याचसाठी हे चंद्र-सूर्य तारे सारे तिच्याच पाठी, जेव्हा प्रदक्षिणा ती घाली मारुतीला तेव्हा पाहायची हो मूर्ती वळून पाठी’सारखा अवखळपणा आहे. ‘तेच ते’ किंवा ‘उपयोग काय त्याचा’ या कवितेत हसता हसता तत्त्वज्ञान सांगणारा मिश्कीलपणा आहे.
‘असा मी तसा मी कसा मी कळेना स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी’ किंवा ‘तसेच घुमते शुभ्र कबुतर’सारखी प्रगाढ वैचारिकता आहे. ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’सारखा सखोल संस्कार आहे. आशयाच्या आणि अनुभवाच्या अंगाने ती जाणीव समृद्ध आणि भाव समृद्ध आहेच, पण तिच्या घाटांचा किंवा आकृतीबंधांचा विचार केला तर त्याही बाबतीत तिच्यात नैसर्गिक लवचिकता आणि विविधता आहे. म्हणजे असे की त्यांनी लयबद्ध आणि छंदवृत्तातल्या कविता जशा लिहिल्या, तशा स्वच्छंदी, तालबद्धा गद्य किंवा मुक्तसुनीते, मुक्तछंद, अभंग अशाही रचना केल्या. गझलेचा फॉर्मही त्यांनी समर्थपणे हाताळला. विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. मा.‘विं.दा’ करंदीकर यांचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…