मुंबई : विकास, समृद्धी ही उद्धव ठाकरेंची कामंच नाहीत. शिव्या घालणं आणि चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे. यामुळे त्यांचा पक्ष लहान होत चालला आहे. पुढच्या निवडणुकीनंतर हा पक्ष राहणार नाही, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले. ते रामनवमीनिमित्त शिर्डीत सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तरं देताना चांगल्या कामात विघ्न आणणं हेच उद्धव ठाकरेंचं काम आहे, असे भाजपा खासदार नारायण राणे म्हणाले.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय राऊत यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नालाही भाजपा खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिले. संजय राऊत या व्यक्तीने खासदार म्हणून देशासाठी, राज्यासाठी आणि स्वतःच्या गावासाठी काय योगदान दिले आहे ? असा प्रतिप्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. काही तरी बोलून चर्चेत राहणे आणि वाद निर्माण करत राहणे हेच काम संजय राऊत करत असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले.