वाल्मिकींच्या रामकथेची सुरुवात युवक श्रीरामचंद्रापासून होते. ‘अवघ्या जगाचा जो आनंद आहे तो आनंदसिंधू म्हणजे श्रीराम’. संत एकनाथ महाराज म्हणतात, रामनामामध्ये अग्नी, सूर्य, चंद्र या बीजाचे प्रतीक, सगळ्या पातकांना जाळून टाकतात. समर्थांच्या जीवनातले शेवटचे वाक्य ‘मज रघुनाथा परी ये जागी आणिक कोणी नाही.’
प्रासंगिक – मृणालिनी कुलकर्णी
जय श्रीराम! वाल्मिकी रामायण ही सर्व रामकथेचे गंगोत्री! वाल्मिकीचे खरे नाव ‘रत्नाकर.’ नारदांनी सांगितल्यानुसार प्रायश्चित्त म्हणून ‘राम, राम’ नामस्मरणांत त्यांच्या अंगाभोवती मुंग्यांचे वारूळ तयार झाले. वारुळाला संस्कृतमध्ये वल्मीक म्हणतात त्यातून वाल्मिकी!
“श्रीरामकथामृत” हे स्वामी गोविंद देव या पुस्तकाच्या आधारे मी ‘कर्मयोगी श्रीरामचंद्राची कथा’ हा लेख लिहिला आहे. वाल्मिकींच्या रामकथेची सुरुवात युवक श्रीरामचंद्रापासून होते. आधीपासून श्रीराम मनुष्यरूपात वावरले. मनुष्याच्या सगळ्या उणिवा, मर्यादा स्वीकारून मानवी मर्यादेच्या अंतर्गतच आपल्या सगळ्या लीला अभिव्यक्त केल्या. उदा. १ पतितांचा उद्धार करताना शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला श्रीरामाच्या चरण स्पर्शाने नारी रूप प्राप्त झाले. २ सेतू बंधनात एका दगडावर ‘रा’ आणि दुसऱ्या दगडावर ‘म’ लिहिलेले दगड वानरांनी पाण्यांत टाकताच चिकटले. श्री रामांचा स्वतःवर पूर्ण ताबा होता. अंगी संयमही होता. पूर्ण आयुष्यांत श्रीरामाने मर्यादेचे पालन केले म्हणून त्यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणतात.
चैत्र नवमी रविवार, दुपारी १२ वाजता जन्माला आलेल्या कौसल्या नंदनाचे नाव महर्षी वसिष्ठांनी ‘राम’ ठेवले. ‘अवघ्या जगाचा जो आनंद आहे तो आनंदसिंधू म्हणजे श्रीराम’. संत एकनाथ महाराज म्हणतात, रामनामामध्ये अग्नी, सूर्य, चंद्र या बीजाचे प्रतीक, सगळ्या पातकांना जाळून टाकतात. “चरितं रघुनाथस्य … महापातकनाशम्”! रामनामात अपार सामर्थ्य आहे. भक्तीने मनुष्याचे जीवन बदलते हे रामकथेत पाहतो. समर्थांनी प्रभू रामचंद्राखेरीज कुणाची स्तुती केली नाही. समर्थांच्या जीवनातले शेवटचे वाक्य “मज रघुनाथा परी ये जागी आणिक कोणी नाही.” शिवछत्रपतींचे आदर्श भगवान श्रीरामचंद्रच होते. रामनामांत एक सुरक्षितेची भावना येते.
गोस्वामी तुलसीदासांच्या रामकथेत मानसरोवराचे चारही घाटावर रामकथा चालू आहे. पहिला घाट – ज्ञानाचा, दुसरा घाट – कर्माचा, तिसरा घाट – भक्तीचा, चौथा घाट – प्रपात्तीचा (म्हणजे पापाचे शालन करावे, जीवन बदलणे) वक्ते स्वतः संत गोस्वामी तुलसीदास आणि श्रोते सामान्य मनुष्य)
वसिष्ठ मुनींच्या आश्रमातून चारही भाऊ समान शिक्षण घेऊन बाहेर पडले; परंतु त्या दिवसांत श्रीराम चिंतामग्न होते. उत्तम वस्त्रे, मिष्टान्न, अलंकार सारे त्यांना नकोसे वाटत होते. ते खाली झोपत. याच सुमारास विश्वामित्रांनी दुष्टांच्या संहाराकरिता राजा दशरथाकडे रामाची मागणी केली. “राजा ! सगळ्या दुष्टांचे मूळ लंकेतला रावण आहे. रावांचे हस्तक संपूर्ण जगात पसरलेले आहेत. या सगळ्यांचा आरंभ रामापासून करावयाचा आहे. जरी रावणाने सीतेला पळविले नसते तरी रावणाचा वध रामाकडून होणार आहे ते श्रीरामचंद्राच्या आयुष्याचे ध्यैय आहे. विश्वामित्रांना श्रीरामाला अयोध्येचा भावी राजा घडविण्यासाठी राजमहालाबाहेर काढले. चाण्यक्यानेही तरुणपणीच चंद्रगुप्ताला बाहेर काढले होते.
विश्वामित्रांनी पूर्वजांच्या कथा, मार्गातील प्रदेशांची माहिती सांगत, स्वतःकडील दिव्यास्त्रांचे ज्ञान देत, वाटेतील गावकऱ्यांशी भेटी करून देत त्यांचे तसेच समाजाचे प्रश्न, झाडे-पशू-पक्षी सगळ्यांची माहिती देत होते. दिवसभर पायी चालायचे, रात्री झाडाखाली झोपायचे.
“ज्याच्यामुळे धर्माचा उच्छाद होतो, माझ्या जनतेला त्रास होतो, मग तो कुणीही असो, मी त्याचा वध करीन” असे सांगून १६ व्या वर्षी श्रीरामाने पहिला त्राटिका वध केला. सुबाहू, मारीच अशा अनेक राक्षसांना श्रीरामाने ठार केले. अयोध्या ते मिथिला या प्रवासात महर्षी विश्वामित्रांनी रामाचे संपूर्ण जीवन घडविले. या संस्कारांमुळेच पुढचा वनवास श्रीरामांना सहन करता आला. मिथिला नगरीत राम – सीता लग्न ! नांगराच्या फळीचे टोक म्हणजे सीत. भूमीत अडकून मिळाली म्हणून सीता ! जनकाची मानस कन्या मिथिला, वैदेही…
“पुत्र वियोगाने तू मरशील” हा राजा दशरथाला दिलेला अंध श्रावणाच्या मातापित्याने दिलेला शाप खरा ठरला. कैकयीच्या वरामुळे रामाला वल्कले नेसून १४ वर्षे वनवास ! ‘जेथे राघव तेथे सीता’, ‘ज्या ठिकाणी प्रभूचे चरण तेथे माझा निवास’ असे म्हणत सीता रामासोबत निघाली. रामभक्तीचा पुतळा लक्ष्मण, लक्ष्मणाने रामाखेरीज अन्य कशाचेही चिंतन केले नाही. रामाबरोबर वनवासाला निघताना श्रीरामाने लक्ष्मणाला मातेची अनुमती घेण्यास सांगताच लक्ष्मण म्हणाला, ‘माता रामो… रामचंद्र’ तूच माझी माता आणि तूच माझा पिता.” श्रीरामाला कोणी त्रास, दुःख दिले की लगेच लक्ष्मण तापत होता. श्रीरामानेही माता, पिता, भाऊ, पत्नी या साऱ्यांचा वियोग सहन केला पण रामायणाच्या शेवटच्या भागांत राजधर्म म्हणून लक्ष्मणाला प्राणदंड शिक्षा सुनावल्यानंतर स्वतः रामचंद्र महर्षी वसिष्ठांना प्रणाम करून म्हणाले, “माझ्याशिवाय लक्ष्मण आणि लक्ष्मण शिवाय मी कधीच राहू शकत नाही. लक्ष्मणा पाठोपाठ श्रीरामानेही शरयू नदीत प्रवेश केला. जगाचा आधार श्रीराम पण श्रीरामाचा आधार लक्ष्मण होता.
भरताचे रामप्रेम हा रामकथेचे आत्मा आहे. भरताला माझ्यासाठी रामाला वनवासात जावे लागले ही खंत होती. भरताचे अंतःकरण रामावरच्या प्रेमाने ओथंबलेले होते. श्रीरामांना अयोध्येत परत बोलावितांना वनवासात गेलेल्या भरताला श्रीराम म्हणाले ‘माझ्या पित्याला संकटातून सोडविण्यासाठी हे व्रत मी घेतले.’ भरताने स्वामी म्हणून नव्हे तर सेवक म्हणून व्रतस्थ जीवन आचरत नंदीग्रामात श्रीरामांच्या पादुकांची सेवा केली. भक्तीचा परमोच्च आदर्श ! भरताची पत्नी मांडवी, लक्ष्मणची उर्मिला आणि तिन्ही माता अयोध्येत!
रामकथेच्या मंदिरात प्रवेश करताना, ज्याचा उल्लेखही रामकथेत नाही अशा शत्रुघ्नाला पहिला प्रणाम करणे आवश्यक आहे. संपूर्ण राज्य, सेना, घरातील महिला साऱ्यांना सांभाळले पण एकदाही सिंहासनावर बसण्याचा क्षुद्र विचारही मनात आला नाही. सुमंत्राच्या रथातून वनवासाला निघाल्यानंतर तमसा नदी, नंतर चालत गंगातीर, चित्रकूट येथे राम भरत भेट झाली होती. महर्षी वशिष्ठ ही तेथेच भेटले.
रामकथेत प्रत्येकाने आपल्या जीवनांत अधिकारांना तिलांजली दिली. सर्वांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले. सर्वांच्या अंतःकरणातील रामप्रेमामुळे त्यांच्याकडून विलास आपोआप सोडून दिले गेले. श्रीराम धर्मज्ञ आणि कृतज्ञ होते. श्रीरामांनी धर्माचा, सद्गुणांचा कधीच त्याग केला नाही. तसेच आपले कोंदड शस्त्र आपल्या जवळ ठेवले. कारण ते जाणून होते, केवळ सज्जनाने सारे प्रश्न सुटत नाहीत.
श्रीराम सतवाक्य होते. (सत्य कधी लपवले नाही. चुकीचे/खोटे कधी बोलले नाही. श्रीराम अष्टवक्र मुनीला म्हणाले होते, “गुरुदेव ! माझ्या जीवनांत सर्वाधिक महत्त्व माझ्या प्रजेला आहे. प्रजेची सेवा करताना मी माझ्या वैयक्तिक सुखाचा अथवा प्रेमाचाही विचार करणार नाही.” (पत्नी सीतेचा त्याग) दहा वर्षांच्या वनवासांत भिन्न भिन्न ऋषींच्या आश्रमांत राहिले, चर्चा केली. वनवासी लोक, भिल्ल, वानर (वाली सुग्रीव), राक्षस, शबरी, बिभीषणासह त्याचे मंत्री सर्वांना श्रीरामाने जोडून घेतले. विशेष म्हणजे जगातला सर्वात लहान मानला जाणारा भिल्लांचा राजा निषाद गृह आणि सर्वोच्च महापुरुष महर्षी वसिष्ठ यांची गळाभेट झाली. काहीकाळ आपसात वैर आलेले वसिष्ठांनी आणि विश्वामित्र ऋषी ही नव्हे सारेच श्रीरामाच्या प्रेमाने जोडले गेले होते. मायावी सुवर्णमृगाचे रूप घेऊन आलेल्या राक्षसाला लक्ष्मणाने ओळखले. तरीही सीतेकडून लक्ष्मण रेषा ओलांडली गेली. सुग्रीव वाली कथानकांत वालीने आपला पुत्र अंगदला श्रीरामाच्या हवाली करतो.
हनुमान – केसरी नामक वानराला वायुदेवाच्या कृपेने झालेला पुत्र हनुमान ! सद्गुणांचा अर्क, अतिशय विद्वान,(चारी वेदांचं ज्ञाता) (बुद्धिमतां वरिष्ठम्). वेषांतर करू शकणारा, ‘सकल गुण निधान’ हनुमान ! श्रीराम-हनुमान पहिली भेट- ऋष्यमूक पर्वताच्या पायथ्याशी घडली. स्वयं हनुमान ब्राह्मण बटूच्या वेशात समोर आल्यानंतर राम लक्ष्मणाने बटूला नमस्कार केला.
जटायूचा भाऊ संपाती ! हे गृध जातीचे. संपातीने एका पर्वताच्या शिखरावर एके ठिकाणी दृष्टी स्थिर केली आणि म्हणाले, एका वाटिकेत वृक्षाखाली भगवती जानकी बसली आहे. जानकी जिवंत आहे हे संपातीमुळे प्रथम कळाले. मग हा मोठा सागर पार कोण करणार? वानरांचे भगवान जांबावताने हनुमानाला सांगितले, ऊठ हनुमंता, हे काम तुझे आहे. ‘सियावर रामचंद्र की जय’! पुढे हनुमानाने लंका दहनाने रावणाला अस्वस्थ केले. हनुमंताच्या बोलण्यांत, कृतीत श्रीरामाविषयी प्रेम, दास्यभाव भक्ती पदोपदी जाणवते. रामकथेत हनुमानाला कोणतेही पद नाही पण त्याच्याशिवाय कोणतेही काम होत नसे. रावणाला युद्धासाठी उतेजित करण्यासाठी शूपर्णखेला ठार न मारता तिचे कान, नाक कापून टाकले. युद्ध होऊ नये याकरिता शेवटपर्यंत श्रीरामाने प्रयत्न केले. युद्ध अटळ झाल्यावर तितक्याच उत्साहाने रणांगणात उतरले. युद्धात अनेक गोष्टी घडल्या. ८७व्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. रावणाला ठार मारले पण रावणाच्या देहाची विटंबना होऊ दिली नाही.
मनुष्य मरण पावला, वैर संपले. सर्व देवांनी स्तुती करताच, श्रीराम म्हणाले, ‘मला देव बनवू नका. मी दशरथपुत्र आहे. बिभीषणाकडे लंका सोपवून श्रीराम १४ वर्षांनी मातृभूमी अयोध्येकडे परतले. ही रामकथा भागवतधर्माच्या हजारो वर्षे आधी जन्माला आली. तेच प्रसंग, तीच पात्रे, तोच राम -तोच रावण, तीच अयोध्या, तीच लंका, तरीही कर्मयोग्याचे सर्वोत्तम जीवन जगणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राचे चरित्र आजही चिंतन करावे, पुन्हा पुन्हा पुन्हा वाचावे, ऐकावे असे वाटते. कारण ही रामकथा एका आदर्शवादी मनुष्याची कथा आहे. जीवनांत कसे वागावे यासाठी ती अनुकरणीय आहे. जय श्रीराम !