Tuesday, April 29, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकुत्र्याचं पिल्लू!

कुत्र्याचं पिल्लू!

कथा – रमेश तांबे

एक कुत्र्याचं पिल्लू होतं. छोटसं, चुणचुणीत, तपकिरी रंगाचं. सारे त्याला आवडीने प्यारे म्हणून हाक मारायचे. “प्यारे” अशी हाक आली की, तो उड्या मारत यायचा. पायाशी लोळण घ्यायचा. आपल्या अंगाला अंग घासायचा. घरातल्या लहान मुलांबरोबर खेळायचा. त्यांना सतवायचा. कधी सईची बाहुलीच पळव, तर कधी दादाचं पुस्तक! त्याच्या खोड्या दिवसभर चालायच्या. त्या नुसत्या बघत बसलं तरी वेळ आनंदात जायचा. सर्व घराला प्यारेने वेड लावलं होतं.

सण आनंदाचा…

खरे तर प्यारेचा, कुत्राच्या पिल्लाचा त्रास कुणालाच नव्हता. घरात ओरडणं नाही, की घाण करणं नाही. तो अगदी शहाण्या मुलासारखा वागायचा. त्यामुळे “प्यारे” साऱ्या घराच्या गळ्यातला ताईत बनला होता. एकदा दादाची घरात पार्टी होती. दादाचे पाच-सहा मित्र आले होते. आई-बाबा सईला घेऊन मावशीकडे गेले होते. त्यामुळे दादा आणि प्यारे दोघेच घरात होते आणि म्हणूनच दादाने पार्टीचे नियोजन केलं होतं. खाण्यासाठी पिझ्झा, बर्गर, फ्रँकी, सँडविच, आइस्क्रीम अशी जोरदार तयारी होती. मग रात्रभर खाणंपिणं सुरू होतं. प्यारेला आज आपण जेवण वाढलंच नाही हे दादाच्या लक्षातच आलं नाही. मग प्यारेनेसुद्धा पिझ्झा, बर्गरवर ताव मारला. आइस्क्रीमचे दोन कप चाटून पुसून खाल्ले. खूप खाल्ल्यामुळे प्यारेचे पोट चांगलेच टम्म झाले. मग घराच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात तो लगेच झोपी गेला.

दुसरा दिवस उजाडला. पहाटे लवकर उठून दादाचे मित्र आपापल्या घरी गेले. दादाने सारे घर आवरले आणि स्वतःची तयारी करून तो अभ्यासाला बसला. एवढ्या वेळात त्याला प्यारेची जराही आठवण झाली नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आई-बाबा आले होते. सई धावतच घरात शिरली आणि प्यारे प्यारे अशी हाक मारू लागली. रोज बेल वाजताच दरवाजाजवळ धावत येणारा प्यारे आज का आला नाही म्हणून बाबांच्या मनातही शंकेची पाल चुकचुकली. तोच आई म्हणाली, “अरे दादा, आपला प्यारे कुठे गेलाय. तो घरात दिसत कसा नाही? तेव्हा कुठे दादाच्या डोक्यात प्रकाश पडला. अरेच्चा आपण कालपासून प्यारेकडे बघितलेच नाही. त्याने काय खाल्ले? काय प्यायले? तो कुठे झोपलाय? काहीच माहीत नाही. “असेल इथेच कुठेतरी!” दादाने वेळ मारून नेली. तेवढ्यात सई रडत रडत आली आणि म्हणाली, “बाबा बाबा आपला प्यारे तिकडे बाल्कनीत झोपलाय. मी त्याला उठवले तरी तो उठत नाही.” मग आई-बाबा धावतच बाल्कनीच्या दिशेने गेले. पाहतात तर काय “प्यारे” खरोखरच अगदी गाढ झोपला होता. बाबांनी त्याला पाहिले तर त्याचे पोट टम्म फुगले होते. पण श्वास चालू होता. डोळे मात्र बंद होते. आता मात्र दादाच्या छातीत धस्स झाले. त्याचे काही बरे-वाईट झाले तर? या विचाराने तो घाबरला. बाबांनी लगेच गाडी काढली आणि प्यारेला कुत्र्यांच्या डॉक्टरकडे नेले.

पंधरा मिनिटांच्या तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, “घाबरण्याचे काही कारण नाही. मी त्याला औषध दिले आहे. पण त्याच्या खाण्यापिण्यावर लक्ष ठेवले पाहिजे. काल त्याने मनसोक्त पिझ्झा, बर्गर, वडापावसारखे काहीतरी पौष्टिक नसलेले पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचे पोट फुगले आहे. इतके की त्यात त्याचा जीवही गेला असता. बरे झाले आपण त्याला लवकर दवाखान्यात आणले.

आता मात्र आईचा पारा चढला. “काय रे दादा, त्याला पिझ्झा कोणी दिला? तू आणला होतास का घरात?” दादाला आपली चूक समजली. तो बाबांना म्हणाला, “बाबा मी चुकलो. काल माझी मित्रांसोबत पार्टी होती. तेव्हा मी हॉटेलमधून सारे पदार्थ मागवले होते. मित्रांच्या नादात प्यारेने काय खाल्ले ते मी बघितलेच नाही!” डॉक्टर म्हणाले, “बघितलंस पिझ्झा, बर्गर, फ्रँकी या सारखे पदार्थ एखाद्याच्या जीवावर उठू शकतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे बंद केले पाहिजेत. थोड्याच वेळात प्यारेने डोळे उघडले. त्यांने दादाकडे बघून पाय हलवले. दादाने त्याला पटकन उचलून घेतले. त्याचे पटापटा मुके घेतले आणि म्हणाला, “चुकलो मी! मला माफ कर. यापुढे तुलाच काय; पण मीसुद्धा कधीच असे अपायकारक पदार्थ खाणार नाही!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -