मराठीचे वैभव

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंद उधळून झाला. अभिमान बाळगून झाला. उत्सव उदंड झाले. वेळ ठेपली आहे मराठी भाषक म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची! आपली जबाबदारी घेण्याची.भाषा जितकी जास्त वापरली जाईल तितकी ती अधिक समृद्ध होत जाते.


आपण मराठीचा वापर जितका कमी कमी करत जाऊ, तितके आपण तिला अधिकाधिक दुबळे करत जाऊ, हे आपण ओळखायला हवे आणि हे चित्र शहरामध्ये अधिक स्पष्ट दिसते. खरे तर कोकण, मराठवाडा, वऱ्हाड अशा वेगवेगळ्या भागातील लेखक त्या त्या प्रदेशातील समाज जीवनाचे चित्रण करीत आहेत. भिल्ल, वारली, कोरकू, गोंड अशा भिन्न भिन्न समाजगटातील लोकांचे जीवन व्यक्त होणे गरजेचे आहे. केवळ अभिजात वर्गाची भाषा श्रेष्ठ नव्हे. प्रमाण भाषा जितकी श्रेष्ठ तितकी बोली भाषा श्रेष्ठ होय. अभिजात भाषेच्या जतन संवर्धनात बोली भाषांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.


त्या त्या बोली भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, लग्नगीते, स्त्रीगीते, सण आणि उत्सवांची गीते यांचा अभ्यास आणि संशोधन म्हणजे एका अर्थी सांस्कृतिक संचिताची जपणूक होय.


अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार डॉ. नेहा सावंत यांना मिळाला. सामवेदी ख्रिस्ती बोली म्हणजे कुपारी बोलीचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केला आहे. बोली अभ्यासाच्या अत्यंत सूक्ष्म पैलूवर त्यांनी काम केले आहे. त्यासाठी वसई आणि आसपासच्या भागात सर्वेक्षण, मुलाखती अशा संदर्भसाधनांचा त्यांनी उपयोग केला. एखाद्या बोलीचा अभ्यास करणे हे चिकाटीचे काम. संवाद, संपर्क, प्रत्यक्षात ती बोली बोलणारा समाज शोधून त्या समाजाचा अभ्यास करणे हे सर्व अशा प्रकारच्या संशोधनात महत्त्वाचे ठरते.माझी एक विद्यार्थिनी डॉ. समृद्धी म्हात्रे हिने आगरी गीतांना केंद्रस्थानी ठेवून पीएच. डी. पदवीकरिता संशोधन केले. आगरी स्त्री गीतांचे कितीतरी मोठे विश्व आहे. हे भांडारच तिने या प्रबंधात एकत्रितपणे समोर आणले.


मध्यंतरी माझ्या वाचनात असा संदर्भ आला की, शैलजा मेनन आणि रामचंद्र कृष्णमूर्ती यांनी कन्नड आणि मराठी या दोन भाषांतील अध्ययन अध्यापनाबाबत केलेल्या अभ्यासावरून खालील निष्कर्ष मांडले.


१) शिक्षणक्षेत्रात किंवा पाठ्य पुस्तकात मुलांच्या मौखिक भाषा आणि बोलींना स्थान नाही.


२) मुले वर्गात त्यांची बोली वापरतात तेव्हा शिक्षक त्यांना संवेदनशीलपणे प्रतिसाद देतातच असे नाही.


हे निष्कर्ष खूप काही सांगणारे आहेत. मुलांनी बोलीचा वापर वर्गात केला की त्या कनिष्ठ असल्याची किंवा त्यावरून त्यांना हिणवण्याची उदाहरणे घडताना दिसतात. मात्र आज ग्रामीण आदिवासी भागात शिक्षक प्रसिद्ध कवितांचे बोलीतून अनुवाद करून घेत असल्याचे कानी येते तेव्हा त्या शिक्षकांच्या कल्पकतेला दाद द्यावी वाटते.बोलीतील शब्दांचा कोश मुलांकडून एकत्रितपणे करवून घेण्याचा उपक्रमदेखील त्यांना देता येईल. दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात आणि हेच तर मराठीचे वैभव आहे.

Comments
Add Comment

आई जगदंबे

कृपावंत जगदंबेच्या अंतरंगी वसलेली दया-माया महानवमी माळेत जीव ओतते. आई भक्ताला पावते. दैत्याबरोबर नऊ दिवस नऊ

भारताची पहिली महिला ट्रकचालक : योगिता रघुवंशी

दुर्गा माता ही भक्ती आणि शक्तीचं रूप मानलं जातं. महिला सशक्तीकरणाचे ते एक प्रतीक आहे. आजच्या काळात स्त्री चूल आणि

अनुवादाची आनंदपर्वणी

आज एका चर्चासत्राच्या निमित्ताने जुनी गोष्ट आठवली. अनुवाद विषयक एका चर्चासत्राचे आयोजन आम्ही केले होते. या

कृतिरूप संघ दर्शन

कंदिलाची काच ज्या रंगाची असते, तशा रंगाची ज्योत आत आहे असे लोकांना वाटते. तसेच आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात

वाढती सत्तांतरे आणि भारतासाठी धडा

आरिफ शेख दक्षिण आणि पूर्व आशियातील देशांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून भू-राजनीतीक संघर्ष सुरू आहे. २०२२ पासून

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील यशस्वी 'अंबिका'

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी लग्न, सात वर्षांत घटस्फोट, दोन वर्षांच्या मुलीचा एकल पालक