Monday, April 28, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनहिजाब परिधान करणारी पहिली मॉडेल

हिजाब परिधान करणारी पहिली मॉडेल

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

बहुतांश मुस्लीम समाजात स्त्रीला एक उपभोग्य वस्तूच समजले जाते. मध्ययुगीन काळातील कायदे तिच्यासाठी वापरले जातात. स्त्री म्हणजे जणू पुनरुत्पादनाचे साधन मानले जाते. ज्या मुस्लीम स्त्रिया याच्याविरोधात आवाज उठवतात त्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले जातात किंवा देहदंडाची शिक्षा केली जाते. तिच्या बाबतीत मात्र वेगळं घडलं. आपल्याच देशातील गृहयुद्धामुळे तिला निर्वासित म्हणून दुसऱ्या देशात जावं लागलं. मात्र तिने आपली नितीमूल्ये सोडली नाहीत आणि तरीसुद्धा जगविख्यात झाली. ही गोष्ट आहे, सोमाली अमेरिकन मॉडेल हलिमा एडनची. जी मोठ्या ब्रँड्ससाठी हिजाब परिधान करून रॅम्पवॉक करणारी पहिली मॉडेल म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाली.

हलिमा एडनचा जन्म १९९७ मध्ये केनियातील एका निर्वासित छावणीत झाला होता. तिचे पालक सोमाली गृहयुद्धातून पळून गेले होते. हलिमा फक्त सहा वर्षांची असताना अमेरिकेत जाण्यापूर्वी तिचे कुटुंब छावणीत आश्रय घेत होते. कालांतराने हलिमाचे कुटुंब सेंट क्लाऊड, मिनेसोटा येथे स्थायिक झाले. हे एक लहान शहर आहे जिथे सोमाली स्थलांतरितांची संख्या लक्षणीय होती.एक स्थलांतरित म्हणून, हलिमाला मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. तिला तिच्या सोमाली असण्यामुळे आणि हिजाब घालण्याच्या निर्णयामुळे शाळेत अनेकदा छळले जात असे. धमकावले जात असे. हलिमाला सांस्कृतिक संघर्षांचाही सामना करावा लागला. तिच्या सोबतच्या मित्र-मैत्रिणींसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना अवघड जाई. अमेरिकन संस्कृती स्वीकारणे आणि स्वतःच्या कुटुंबाची इस्लामिक मूल्ये राखणे यात अडचण जाणवत होती. तिचा स्वतःला स्वीकारण्याचा प्रवास कठीण होता. तिने एका अशा जगात प्रवास केला जिथे अनेकदा तिची श्रद्धा आणि ओळख चुकीची समजली जात असे.

हलिमाची मॉडेलिंग कारकीर्द अनपेक्षितपणे सुरू झाली. २०१६ मध्ये, जेव्हा ती १९ वर्षांची होती, तेव्हा तिला एका मैत्रिणीने मिस मिनेसोटा यूएसए स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यावेळी, ती हिजाब परिधान करणारी एकमेव स्पर्धक होती. तिने हा किताब जिंकला नाही मात्र तरी ती स्पर्धेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरली ते तिच्या हिजाब परिधानामुळे. त्यामुळे ती बातम्यांमध्ये आली. मॉडेलिंग उद्योगातील रूढींना आव्हान देण्याबद्दल आणि सौंदर्य मानकांची पुनर्परिभाषा करण्याबद्दल हलिमाची कथा एक सक्षम उदाहरण ठरले.अल्पावधीत तिने प्रमुख मॉडेलिंग एजन्सींचे लक्ष वेधले. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयएमजी मॉडेल्ससोबत तिने करार केला. या करारामुळे फॅशन क्षेत्रात तिच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. फॅशन जगात हलिमाचे पदार्पण अभूतपूर्व होते. २०१७ मध्ये न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणाऱ्या हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या मॉडेलपैकी ती एक बनली. व्होग अरेबिया, स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसूट सारख्या मासिकांच्या मुखपृष्ठांवर ती झळकली. यामुळे फॅशन जगात तिचे स्थान आणखी दृढ झाले.

हलिमाने लक्षणीय यश मिळवले असले तरी, तिचा प्रवास अडथळ्यांशिवाय नव्हता. फॅशन जगत हे पारंपरिक पाश्चात्त्य सौंदर्य मानकांवर आधारित आहे. सुरुवातीला फॅशन उद्योगातील अनेकांना हिजाब परिधान करणारी मॉडेल म्हणून ती कशी काम करते याबद्दल शंका होती. मुस्लीम समुदाय आणि मुख्य प्रवाहातील उद्योग या दोन्हींकडून हलिमाला टीकेचा सामना करावा लागला. काहींना वाटले की ती “योग्य मुस्लीम अनुयायी” नाही कारण ती देहप्रदर्शन करणाऱ्या फॅशन उद्योगामध्ये आहे, तर काहींना वाटले की उद्योगातील तिचे यश तिच्या धार्मिक मूल्यांच्या विरोधात आहे.

शिवाय, तिच्या मूल्यांचा आदर केला जाईल याची खात्री करण्यासाठी हलिमाला सतत स्वतःचे समर्थन करावे लागले. फॅशनसाठी तिने तिच्या श्रद्धेशी तडजोड करण्यास नकार दिला. तिच्या कारकिर्दीत तिने नेहमीच हिजाब परिधान केले आणि विनम्र स्वभाव कायम ठेवला.आव्हानांना न जुमानता, हलिमा जगभरातील तरुण मुस्लीम महिलांसाठी एक आदर्श बनली आहे. ती तिच्या व्यासपीठाचा वापर सामाजिक नियमांना आव्हान देण्यासाठी आणि फॅशन व माध्यमांमध्ये मुस्लीम महिलांचे अधिक समावेशक प्रतिनिधित्व करण्यासाठी करते. हलिमाचे यश दर्शवते की एखादी व्यक्ती फॅशनेबल आणि नम्र दोन्ही असू शकते.

हलिमाने निर्वासितांचे हक्क, महिला सक्षमीकरण आणि वांशिक अन्याय यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हलिमाने पुढाकार घेतला आहे. ती निर्वासित म्हणून तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या सोमाली वारशावरील तिच्या अभिमानाबद्दल बोलते. हलिमा एडनचा निर्वासित छावणीपासून आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंतचा प्रवास हिजाब परिधान करणारी सुपर मॉडेल म्हणून तिच्या चिकाटी आणि प्रतिनिधित्वाच्या शक्तीचा पुरावा आहे. ती केवळ तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीसाठीच नाही तर सांस्कृतिक आणि धार्मिक अडथळे दूर करण्यात तिच्या भूमिकेसाठी एक आदर्श बनली आहे. तिच्या यशाद्वारे, ती जगभरातील महिलांना त्यांची ओळख स्वीकारण्यासाठी आणि सामाजिक अपेक्षांना आव्हान देण्यासाठी प्रेरित करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -