जसप्रीत बुमराह आरसीबी सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात सामील
मुंबई : आयपीएलच्या गुणतक्त्यात आठव्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी. मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमधून सावरला आहे. तो संघात परतला आहे. टीमचे फिजिओ त्याची तपासणी करतील आणि काही चाचण्या घेतील. यानंतर बमराह कधीपासून खेळेल हे जाहीर केले जाणार आहे. यामुळे बुमराह परतला असला तरी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही, हे अद्याप जाहीर झालेले नाही.
यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी एकाच सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. उर्वरित तीन सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. यामुळे दोन गुण आणि ०.१०८ या धावगतीच्या (नेट रनरेट) जोरावर मुंबई इंडियन्स आठव्या स्थानी आहे. गुणतक्त्यातील स्वतःची कामगिरी सुधारण्यासाठी संघाला उत्तम कामगिरीची आवश्यकता आहे. या मोक्याच्या क्षणी बुमराह संघात परतला आहे.
Hyderabad Sunrisers vs Gujrat Titans, IPL 2025: आजच्या सामन्यात हैदराबादला सूर गवसेल का?
या वर्षाच्या सुरुवातीला सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटच्या कसोटी दरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह मैदानाबाहेर गेला. घरच्या मैदानावर झालेल्या इंग्लंड विरुद्वच्या मालिकेत आणि चॅम्पियनस ट्रॉफीत तो खेळू शकला नव्हता. पण आता बुमराह दुखापतीतून सावरला आहे. मुंबई इंडियन्स आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाच महिन्यांच्या पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. बुमराहने बंगलोर येथे उपचार घेतले आणि फिटनेस जपण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली. पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून मंजुरी घेऊन बुमराह मुंबई इंडियन्स संघात सामील झाला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ थीम असलेल्या व्हिडिओद्वारे बुमराहच्या पुनरागमनाची घोषणा केली.
बुमराहच्या अनुपस्थितीत, मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये चार सामने खेळले असून त्यापैकी तीन गमावले आहेत. त्याच्या पुनरागमनामुळे संघाच्या गोलंदाजी आक्रमणाला बळकटी मिळेल, ज्यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
बुमराहने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून मुंबई इंडियन्ससाठी १३३ सामन्यांमध्ये १६५ बळी घेतले आहेत. त्याच्या अनुभव आणि कौशल्यामुळे संघाला मोठा फायदा होईल.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.